Jamda Dam Scam Rajapur: जामदा धरण प्रकल्पात बोगस झाडे दाखवून मोबदला लाटला!

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांचा गंभीर आरोप; चौकशीच्या भीतीने ब्राह्मण खोऱ्यात नव्याने काजू लागवड सुरू

राजापूर : काजिर्डा-जामदा धरण प्रकल्पात प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली झाडे कागदोपत्री दाखवून शासनाकडून लाखांचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आता चौकशीच्या भीतीने पुरावे लपवण्यासाठी ब्राह्मण खोरे परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर काजू लागवड सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे.

या प्रकरणी त्यांनी राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची आक्रमक मागणी केली आहे.

दलाल व अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासकीय तिजोरीची लुट

जामदा धरणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, झाडांच्या मोबदल्यात मोठी अनियमितता झाल्याचे उघड होत आहे. प्रत्यक्षात जागेवर नसलेली झाडे कागदावर दाखवून काही शेतकरी व संबंधितांनी शासकीय तिजोरीतून बेकायदेशीर मोबदला लाटला आहे. आता या घोटाळ्याची चौकशी होणार या भीतीने त्याच ठिकाणी घाईगडबडीने नव्याने काजूची झाडे लावली जात आहेत. हा सर्व गैरप्रकार दलाल आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचा थेट आरोप सौंदळकर यांनी निवेदनातून केला आहे.

पोलिसांकडे पंचनामा अन् गुन्हा दाखल करण्याची मागणी

या प्रकरणी पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जागेचा पंचनामा व छायाचित्रण (व्हिडीओग्राफी) करावे, तसेच महसूल व वन विभागाच्या जुन्या नोंदी बारकाईने तपासाव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर आणि या भ्रष्टाचारात सामील असणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आवाहनही सौंदळकर यांनी केले आहे.

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:45 03-10-2026