Rajapur Kelvali Grampanchayat Ghantagadi: केळवली ग्रामपंचायतीकडून अखेर घंटागाडी सुरू!

ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता व्यवस्थेला आता गती मिळणार; डंपिंग ग्राउंडचेही काम पूर्णत्वास, गावातील स्वच्छतेला प्राधान्य

राजापूर : केळवली ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता व्यवस्थेला आता अधिक गती मिळणार असून ग्रामपंचायतीकडून अखेर घंटागाडी सुरू करण्यात आली आहे. गावातील वाडीवाडीत फिरून घंटागाडीच्या माध्यमातून घराघरांतून कचरा संकलित करण्याचे धोरण ग्रामपंचायतीने आखले आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात येत असलेल्या डंपिंग ग्राउंडचे कामही पूर्णत्वास आले असून गावातील स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

घरपट्टी भरणार्या मालमत्ताधारकांना कचरा कुंड्यांचे वाटप

महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, केळवली येथे सन २०२६-२७ ची घरपट्टी आगाऊ भरलेल्या मालमत्ताधारकांना वैयक्तिक कचरा कुंडीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून आपल्या कचरा कुंडीचा ताबा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून नागरिकांना कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. घरपट्टीची २०२६-२७ ची आकारणी अद्याप भरलेली नसलेल्या मालमत्ताधारकांनी ती भरून सहकार्य करावे, असेही ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर असणार लक्ष

दरम्यान, गावातील व्यावसायिक तसेच कोंबडी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी कचरा उघड्यावर टाकू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. व्यवसायातून निर्माण होणारा कचरा रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Khabardar diwali fest

वाडीवाडीत फिरून कचरा संकलन करण्यावर ग्रामपंचायतीचा विशेष भर राहणार आहे. घंटागाडीच्या माध्यमातून नियमितपणे कचरा संकलित करून तो नियोजित डंपिंग ग्राउंडवर नेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीमध्येच द्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

घंटागाडी सुरू होणे, डंपिंग ग्राउंडचे काम पूर्णत्वास येणे आणि घरपट्टी आगाऊ भरणाऱ्या ग्रामस्थांना कचरा कुंड्यांचे वाटप या उपक्रमांमुळे केळवलीतील कचरा व्यवस्थापनाला अधिक शिस्तबद्ध स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे. स्वच्छ आणि सुंदर केळवलीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 03-10-2026