एईपीएस (AEPS) सुविधा देणाऱ्या राज्यातील पहिल्या ३ बँकांमध्ये स्थान; गतवर्षाच्या तुलनेत नफ्यात १०.७४ कोटींची वाढ
*रत्नागिरी :* रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (RDCC Bank) आपल्या प्रगतीची घोडदौड कायम राखत ६ हजार कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. ३० सप्टेंबरअखेरच्या अर्धवार्षिक अहवालानुसार, बँकेने ४९ कोटी १३ लाख ३६ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत नफ्यात तब्बल १० कोटी ७४ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.
*डिजिटलायझेशनवर भर; एईपीएस सुविधा देणारी राज्यातील आघाडीची बँक*
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहक सेवा अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व डिजिटलायझेशनवर विशेष भर दिला आहे. एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS), एटीएम (ATM), मोबाईल बँकिंग आणि क्यूआर कोड (QR Code) यांसारख्या आधुनिक सुविधांनंतर आता बँक ग्राहकांसाठी ‘एईपीएस’ (Aadhaar Enabled Payment System) सुविधा कार्यान्वित करत आहे. विशेष म्हणजे, अशी अत्याधुनिक सुविधा देणाऱ्या महाराष्ट्रातील केवळ तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेने मानाचे स्थान मिळवले आहे.
*संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश*
बँकेच्या व्यवसायात आणि नफ्यात झालेल्या या उल्लेखनिय वाढीबद्दल बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव आणि सर्व संचालक मंडळाने बँकेच्या सर्व सभासद व ग्राहकांचे आभार मानले आहेत. संचालक मंडळाचे अचूक धोरणात्मक निर्णय आणि बँकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाचे अहोरात्र प्रयत्न यामुळेच बँकेला हे दैदीप्यमान यश संपादन करता आले, अशी प्रतिक्रिया बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी दिली.














