घराच्या अंगणातील पंपशेडमध्ये घडली दुर्दैवी घटना; दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
*दापोली :* दापोली शहरातील नवानगर परिसरात एका ७९ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घराच्या अंगणातील पंपशेडमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसिंग गणपतराव राजेशिर्के (वय ७९, रा. दापोली नवानगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
*अंगणातील पंपशेडमध्ये आढळला मृतदेह*
मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मानसिंग राजेशिर्के हे घराच्या अंगणाच्या पुढील बाजूस असलेल्या विहिरीजवळील पंपशेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळून आले. ही घटना निदर्शनास येताच कुटुंबीयांनी तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी हालचाली सुरू केल्या.
*रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू*
डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून राजेशिर्के यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची अधिकृत नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.














