राजापूर पोलिसांत चालकाविरोधात गुन्हा दाखल; चालक व क्लिनर किरकोळ जखमी, घटनास्थळावरून पळ काढला
*राजापूर :* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर हद्दीत मद्यप्राशन करून अतिवेगात आणि बेदरकारपणे कंटेनर चालवणाऱ्या एका चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला. हा भरधाव कंटेनर महामार्गाचा दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन पलटी झाला. या अपघातात महामार्गाचे आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*मद्यधुंद अवस्थेत अतिवेगात चालवले वाहन*
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत ज्योती चव्हाण (वय २९, रा. राजारामपुरी ३ री गल्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मूळ रा. आक्कोल, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
दिनांक १ ऑक्टोबर रोजी पहाटे १:४८ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा ते मुंबईच्या दिशेने अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (क्र. MH 43 CK 6872) चालवून नेला जात होता. गंगातीर्थ फाट्यापुढे असलेल्या वक्रतुंड हॉटेलसमोर आरोपी चालकाने रस्त्याची कोणतीही परिस्थिती न पाहता मद्यप्राशन करून अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन उजव्या बाजूला पलटी झाला.

*माहिती न देता घटनास्थळावरून पळ*
अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून चालक व सोबत असलेला क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर आरोपी चालक रणजीत चव्हाण याने पोलिसांना किंवा प्रशासनाला अपघाताची कोणतीही माहिती दिली नाही; तसेच अपघातग्रस्त वाहन व रस्त्यावरील सुरक्षेची खबरदारी न घेता तो घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बापुराव महादेव काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४ व १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.













