Sangameshwar News: ग्रामसभेचे सचिव म्हणून काम करण्यास संगमेश्वरातील शिक्षकांचा तीव्र नकार

Sangameshwar News: ग्रामसभेचे सचिव म्हणून काम करण्यास संगमेश्वरातील शिक्षकांचा तीव्र नकार

प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; जळगावमधील हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षका आक्रमक

*संगमेश्वर :* ग्रामसभा किंवा इतर ग्रामपंचायत कामांसाठी सचिव म्हणून शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांची नियुक्ती करण्यास प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, तालुका संगमेश्वर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात समितीच्या वतीने गटविकास अधिकारी (पंचायत समिती, संगमेश्वर) यांना अधिकृत निवेदन देऊन आपली स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.

*जळगावमधील घटनेचा निषेध आणि सुरक्षेचा प्रश्न*
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान घडलेल्या अत्यंत गंभीर घटनेमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याला आपला प्राण गमवावा लागला होता. या दुर्दैवी घटनेचा सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभेचे सचिव म्हणून काम करण्यास शिक्षकांनी पूर्णपणे नकार दिला आहे. ग्रामसभेतील विषय, कामकाज किंवा निधी याबाबत शिक्षकांना पुरेशी कल्पना नसते आणि अशा स्थितीत अप्रिय किंवा हिंसक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

*एकल शिक्षकी शाळा आणि विविध संघटनांचा पाठिंबा*
तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अवघा एकच शिक्षक कार्यरत आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांना ग्रामपंचायत सचिव म्हणून आदेशित करणे अत्यंत अयोग्य असल्याने संगमेश्वर तालुक्यातील कोणत्याही शिक्षक, मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जुनी पेन्शन संघटना, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, प्रोटॉन संघटना, दिव्यांग शिक्षक संघटना, शिक्षक भारती आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांसारख्या विविध संघटनांच्या अध्यक्षांच्या सह्या आहेत.

Shanti 4