Ratnagiri : राजीवडा, मांडवी खाडीमुखातील गाळ उपशाला गती द्या!

Ratnagiri : राजीवडा, मांडवी खाडीमुखातील गाळ उपशाला गती द्या!

जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोर समिती, मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी जिंदल यांना निवेदन

*रत्नागिरी :* राजीवडा खाडी व मांडवी खाडीमुखातील गाळ उपशाचे काम तातडीने सुरू करून ब्रेकवॉटरच्या कामाला गती देण्याबाबत जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोर समिती व मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन देण्यात आले आहे.

*मच्छीमारांच्या सुरक्षित ये-जा करण्याचा प्रश्न गंभीर*
राजीवडा खाडी व मांडवी खाडीमुखाशी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ, वाळू व सँड बार साचत असल्याने मच्छीमारांच्या होड्यांच्या सुरक्षित ये-जा करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. विशेषतः छोट्या मच्छीमारांना कमी पाण्याची खोली व गाळामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नौका अडकणे, नुकसान होणे तसेच जिविताला धोका निर्माण होण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाही एका छोट्या नौकेला अपघात झाला होता; त्यावेळी खलाशांना वाचवण्यात अन्य नौका चालकांना यश आले होते.

*शासनाकडे सातत्याने पाठपुरावा*
या प्रश्नाची दखल घेत जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोर समिती तसेच राजीवडा-फणसोप, भाट्ये, सोमेश्वर व कर्ला परिसरातील मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीने गेल्या ४-५ वर्षांपासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ‘जनता दरबार’मध्ये पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्याकडेही हा प्रश्न मांडण्यात आला होता.

Khabardar diwali fest

*पर्यावरणीय शंकांवर तांत्रिक तपासणीचे आवाहन*
दरम्यान, भाट्ये येथे ब्रेकवॉटरचे काम सुरू झाले असल्याने राजीवडा खाडीतील गाळ उपशाचे कामही लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. ब्रेकवॉटर आणि गाळ उपसा ही दोन्ही कामे एकमेकांना पूरक असून मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनावश्यक विलंब होऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. काही नागरिकांनी तांत्रिक व पर्यावरणीय शंका उपस्थित केल्या असल्या तरी त्यांची कागदपत्रे व तांत्रिक अहवालाच्या आधारे तपासणी करावी, मात्र या कारणांमुळे मच्छीमारांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला विलंब होऊ नये, असे समितीने स्पष्ट केले आहे.

यावेळी राजीवडा कोर समितीचे अध्यक्ष नजीर वाडकर, कार्याध्यक्ष इम्रान सोलकर, सल्लागार शकील दावत, रहीम दलाल, लुकमान कोतवडेकर आदी उपस्थित होते.