Chiplun News: १७ वर्षीय मुलाची रुग्णालयातच गळफास लावून आत्महत्या; चिपळूण तालुक्यात खळबळ

Chiplun News: १७ वर्षीय मुलाची रुग्णालयातच गळफास लावून आत्महत्या; चिपळूण तालुक्यात खळबळ

चिपळूण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

*चिपळूण :* चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील एका खासगी रुग्णालयात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयात रुग्णांच्या नोंदीसाठी गेलेल्या या मुलाने अचानक हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे वहाळ परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

*रुग्णालयात घडला प्रकार*
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० ते ९:१५ वाजण्याच्या दरम्यान वहाळ येथील डॉ. विजय सहस्त्रबुद्धे यांच्या ‘आनंदी नर्सिंग होम’ या खासगी रुग्णालयात ही घटना घडली.

साहिल सुरेश भागडे (वय १७ वर्षे, रा. वहाळ घडशीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या घटनेची फिर्याद मयताचे नातेवाईक सुधाकर गोपाळ भागडे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे.

Shanti 3

नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन पाहिले असता उघडकीस आला प्रकार
मिळालेल्या तपशिलानुसार, मयत साहिल हा डॉ. विजय सहस्त्रबुद्धे यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची नोंद करण्यासाठी गेला होता. मात्र, रात्री ८:४५ वाजेपर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेले खबर देणारे सुधाकर भागडे हे आपल्या पत्नी व वहिनीसह त्याला शोधण्यासाठी रुग्णालयात गेले. तेथे रुग्णालयाच्या खोलीत पाहिले असता, साहिल हा पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

यानंतर तातडीने रुग्णालयातील डॉ. विजय सहस्त्रबुद्धे यांनी त्याला तपासून रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली असून, मुलाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.