दुष्काळातून वगळलेल्या तालुक्यांचा तातडीने समावेश करण्याची मागणी; योग्य पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे शेतकाऱ्यांचे आवाहन
*रत्नागिरी :* चिपळूण आणि गुहागर तालुक्यांत सप्टेंबर महिन्यात पावसाने मारलेल्या ओढीमुळे भात व नाचणी पिकांवर मोठ्या प्रमाणावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन फळधारणेच्या काळात ५० टक्क्यांहून अधिक पाऊस कमी पडल्यामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक पूर्णपणे करपून गेले आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळातून वगळलेल्या उर्वरित सहा तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करावा, अशी तीव्र मागणी चिपळूण व गुहागर परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
*सप्टेंबरमधील तुटीमुळे भातरोपे पिवळी पडली*
चिपळूण व गुहागर तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत असमाधानकारक राहिले. मार्गताम्हाने, रामपूर, कळकवणे आदी भागांत असमान पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात गुहागरमध्ये अवघा ४८ टक्के, तर चिपळूणमध्ये ५४ टक्के पाऊस नोंदवला गेला. भातपीक फळधारणेच्या काळात जमिनीला ओलावा असणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, पाऊस न पडल्याने शेतातील जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून भातरोपे पिवळी पडली आहेत. त्यामुळे पिकात दाणा धरणे अशक्य झाले असून शेतकर्यांच्या हाती धान्याऐवजी केवळ पेंढाच पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
शासकीय मदतीबाबत शेतकऱ्यांची नाराजी
पावसाच्या अभावामुळे यंदा ५० टक्केही पीक हाती लागणे मुश्कील बनले आहे. कागदोपत्री पंचनाम्यांचे केवळ फार्स केले जातात आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फारशी मदत मिळत नाही, अशी तीव्र नाराजी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुळात कोकणातील शेतकरी पीककर्ज घेत नाही आणि घेतलेले कर्ज वेळेत फेडतो; त्यामुळे सर्वसाधारण कर्जमाफीचा कोकणातील शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही आणि ते शासकीय मदतीपासून वंचित राहतात.

*संयुक्त पंचनामे करून स्वाक्षरी घेण्याची मागणी*
यावर्षी सरासरी पाऊस २५ टक्क्यांहून अधिक कमी झाला असून सप्टेंबरमध्ये ही तूट ५० टक्क्यांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी सेवक, कृषी मंडळ अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे, त्यांना थेट आर्थिक मदत दिली जावी आणि पंचनामा करताना शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी स्थानिक शेतकरी नेते शौकत मुकादम यांनी केली आहे.













