गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित समस्येवर जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; पाणी पुन्हा सुरू
*चिपळूण :* तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटातील मूर्तवडे धनगरवाडी येथील गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर सुटला आहे. जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर संबंधित विभागाने तातडीने दखल घेत बोअरवेलची दुरुस्ती केली असून, यामुळे वाडीतील ग्रामस्थांना पुन्हा नियमित पाणी उपलब्ध झाले आहे.
प्रभाग समितीच्या बैठकीत मांडली होती समस्या मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग समितीच्या बैठकीदरम्यान मूर्तवडे धनगरवाडीतील ग्रामस्थांनी पत्राद्वारे आपल्या पाणी समस्येकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते व हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. बोअरवेलमधून पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे वाडीतील नागरिकांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर शिवानी सावंत यांनी संबंधित विभागाशी तत्काळ पत्रव्यवहार करून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू केला.
प्रत्यक्ष पाहणी आणि तातडीने दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही शिवानी सावंत यांनी हा विषय पोटतिडकीने मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी मूर्तवडे धनगरवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन बोअरवेलची पाहणी केली. पाहणीनंतर ठेकेदारांमार्फत बोअरवेलची आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करून घेण्यात आली. दुरुस्तीनंतर बोअरवेलमधून पुन्हा सुरळीत पाणी सुरू झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न तातडीने सोडवल्याबद्दल ग्रामस्थांनी शिवानी सावंत यांचे आभार मानले आहेत.














