राज्यभरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरटीओची कारवाई; कडक पावले न उचलल्यास आंदोलनाला पाठिंबा देण्याचा रत्नदुर्ग रिक्षा संघटनेचा इशारा
रत्नागिरी: Ratnagiri Rickshaw Business सध्या सुरळीत सुरू असला, तरी राज्यात विविध भागांत रॅपिडो (Rapido) विरोधात रिक्षा चालकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. जिल्ह्यात रॅपिडोप्रमाणे अनधिकृत दुचाकी सेवा सुरू होऊ नये, यासाठी येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती रत्नदुर्ग रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर यांनी दिली आहे.
आरटीओची कारवाई आणि संघटनेची भूमिका
राज्याच्या विविध भागांत रॅपिडो विरोधात रिक्षा चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यभर आंदोलन सुरू झाल्यानंतर रॅपिडोप्रमाणे दुचाकी पुरवणाऱ्यांवर चार दिवसांपूर्वी रत्नागिरीत आरटीओने (RTO) कारवाई केली होती. मात्र, अशी यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यात कार्यान्वित होऊ नये यासाठी संघटनेने आता आक्रमक पावले उचलण्याचे ठरवले आहे.
कडक कारवाई न केल्यास आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा
जिल्ह्यात आरटीओने कडक कारवाई न केल्यास, राज्यभरात सुरू असलेल्या रिक्षा चालकांच्या आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातूनही पाठिंबा द्यावा लागेल, असे स्पष्ट मत रत्नदुर्ग रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनानंतर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे स्थानिक रिक्षा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.














