कोकणचे पाणी मुंबईला नेण्याच्या मुद्द्यावर ठाम विरोध; वेळ पडल्यास कोकणच्या हितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा दिला इशारा
रत्नागिरी :
कोकणचे पाणी मुंबईला नेण्याच्या मुद्द्यावर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत ठाम आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. "आधी कोकणाला पुरेसे पाणी मिळू द्या, त्यानंतरच दुसरा कोणताही निर्णय घ्या," असे स्पष्ट करत, कोकणातील जनतेच्या पाण्याच्या हक्कासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासही आम्ही तयार आहोत, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आधी पाण्याने समृद्ध झाले पाहिजेत :
पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना अस्मिता केंद्रे म्हणाल्या की, "कोणाची भूमिका चुकीची आहे असे मी म्हणणार नाही, परंतु उपलब्ध असलेले पाणी पहिल्यांदा कोकणाला पुरू द्या. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांतील जनता, शेती, उद्योग, व्यवसाय आणि वीजनिर्मिती या सर्व गोष्टी या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे पहिल्यांदा माझे कोकण पाण्यासाठी समृद्ध झाले पाहिजे आणि त्यानंतरच इतर कोणताही निर्णय घेतला गेला पाहिजे. सध्या तरी आमचा या प्रस्तावाला ठाम विरोध आहे."
कोकणच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही :
मुंबईला पाणी नेण्याबाबत कोकणातील जनमानसातून तीव्र विरोधाच्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे नमूद करत केंद्रे पुढे म्हणाल्या की, "जनतेच्या या भावनांसोबत माझा रत्नागिरी जिल्हा, माझे प्रशासन आणि मी माझ्या नेत्यांसोबत व पक्षासोबत ठामपणे उभी आहे. आपली संस्कृतीच अशी आहे की हक्काचे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे कोकणच्या पाण्याच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला तर तो अजिबात चुकीचा ठरणार नाही."

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून कोकण पाणीटंचाईमुक्त करण्याची गरज :
कोकणात दरवर्षी मुबलक पाऊस पडतो, मात्र योग्य नियोजनाअभावी हे पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जाते. हे पाणी अडवून आणि साठवून कोकणातील शेती, पिण्याचे पाणी, स्थानिक उद्योग आणि वीजनिर्मितीसाठी वापरले गेले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोकणातील नद्या, धरणे आणि बंधारे यांचे योग्य नियोजन केल्यास संपूर्ण कोकण कायमस्वरूपी पाणीटंचाईमुक्त होऊ शकते. कोकणातील जनतेच्या हक्काचे पाणी आधी कोकणालाच मिळाले पाहिजे, हीच संपूर्ण कोकणवासीयांची जनभावना असल्याचे अस्मिता केंद्रे यांनी स्पष्ट केले.













