Tenancy Act च्या कलम ६५ संदर्भातील गैरसमजांवर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण; मोठ्या लँड बँक धारकांनी पडीक जमिनी उत्पादनाखाली आणण्याचे आवाहन
नागपूर: Tenancy Act च्या कलम ६५ संदर्भातील विधानावरून सुरू झालेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना, राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाहीत, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी दिली आहे. स्वतःची जमीन कसणाऱ्या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणताही धक्का लागणार नसून, शेतकऱ्यांकडून ५०, १०० किंवा २०० एकर शेती खरेदी करून लँड बँक तयार करणाऱ्या आणि त्या पडीक ठेवणाऱ्या मोठ्या जमीनधारकांनी पुढील तीन ते पाच वर्षांत त्या जमिनी शेती उत्पादनाखाली आणाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कलम ६५ बाबत गैरसमज दूर केल्याचे स्पष्टीकरण
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, राज्याच्या १९४८ च्या कुळ कायद्यातील कलम ६५ नुसार तीन वर्षे जमीन पडीक ठेवल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येण्याच्या तरतुदीचा आपण उल्लेख केला होता. मात्र, आपल्या बोलण्याची गल्लत झाली किंवा काही लोकांनी गैरसमज निर्माण केला. या तरतुदीचा अर्थ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार जमा करणार असा अजिबात नाही. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भातील जो मूळ शेतकरी स्वतःची जमीन कसतो, त्याच्या जमिनीबाबत कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्याची एक इंचही जमीन कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महसूल मंत्रालय हे राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या जमिनींचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या जमिनीचे हक्क मिळवून देण्यासाठी आहे; शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी महसूल मंत्रालय नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

लँड बँक धारकांना पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याचे आवाहन
काही मोठ्या व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून ५०, १००, २०० एकर शेतीच्या जमिनी खरेदी करून लँड बँक तयार केली असून, त्यावर फार्महाऊस उभारण्यात आले आहेत; मात्र प्रत्यक्ष शेती केली जात नाही, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणावर शेतीच्या जमिनी पडीक ठेवणे राज्याला परवडणारे नसून, राज्याचे आणि देशाचे सकल उत्पन्न (जीडीपी) व कृषी उत्पादन वाढवायचे असेल तर उपलब्ध शेतीच्या जमिनी उत्पादनाखाली आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीच्या जमिनी खरेदी केल्या आहेत, त्यांनी पुढील तीन ते पाच वर्षांत त्या जमिनी शेती उपयोगाखाली आणाव्यात. आतापर्यंत शेती केली नसेल तरी चालेल; परंतु पुढील तीन वर्षांत किमान या जमिनींवर काही ना काही लागवड सुरू करावी, अशी सूचना व विनंती त्यांनी केली. फार्महाऊस बांधले असतील किंवा जमीन खरेदी केली असेल तर त्याला हरकत नाही; मात्र शेतीच्या जमिनी पडीक ठेवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
चारा, बांबू किंवा पिकांची लागवड करण्याचा सल्ला
अशा जमिनींवर चारा लागवड, बांबू लागवड किंवा अन्य कृषी पिकांची लागवड करता येऊ शकते. चांगला पाऊस झाल्यास या जमिनींचा शेतीसाठी उपयोग करून कृषी उत्पादन वाढवता येईल आणि त्यामुळे राज्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.













