Ratnagiri Temperature News: रत्नागिरीत ‘ऑक्टोबर हिट’चा तीव्र तडाखा; तापमान ३८ अंशांवर!

Ratnagiri Temperature News: रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तीव्र तडाखा; तापमान ३८ अंशांवर!

हर्णैतून मान्सून अधिकृतपणे परतला; परतीच्या पावसाची विश्रांती आणि वाढत्या उकाड्याने शहरवासीय हैराण

*रत्नागिरी :* गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतर रत्नागिरी शहर आणि परिसरात ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याचे कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने उन्हाच्या तीव्र झळा आणि प्रचंड उकाड्याचा फटका रत्नागिरीकरांना बसला. मात्र, रविवारी (४ ऑक्टोबर) सायंकाळी अचानक मंद वारे वाहू लागल्याने हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

*हर्णै बंदरातून मान्सून अधिकृतपणे परतला*
ऑक्टोबर २०२६ च्या सुरुवातीलाच राज्यातून नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) वेगाने मागे फिरले आहेत. भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरातून मान्सून अधिकृतपणे मागे फिरल्याची घोषणा केली आहे. सध्या मान्सूनच्या परतीची मुख्य रेषा कोकणातील हर्णै, मध्य महाराष्ट्रातील बारामती, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील ब्रह्मपुरी या भागांतून जात आहे. दरवर्षी मान्सून जाताना परतीचा पाऊस पडतो; मात्र यंदा रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाची नोंदच झाली नसल्याने पावसाचा शेवटचा टप्पा कोरडाच गेल्याचे चित्र आहे.

*तापमान ३८ अंशांवर; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट*
ऋतू बदलाच्या या काळात रत्नागिरीतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, २ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीचे कमाल तापमान थेट ३८.० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, तर किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस राहिले. ३ ऑक्टोबर रोजीही उन्हाचा तडाखा कायम राहत कमाल ३७.७ अंश सेल्सिअस आणि किमान २६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग दोन दिवस पारा ३८ अंशांवर गेल्याने दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता.

Happy journey marathi

रविवारी कमाल तापमानात दोन अंशांची घट होऊन ते ३५.५ अंश सेल्सिअसवर आले असले, तरी दिवसभरातील कडक ऊन आणि तीव्र उकाड्याने नागरिक त्रस्त होते. अखेर रविवारी सायंकाळी हवामानात सकारात्मक बदल होऊन मंद वारे वाहू लागल्याने वातावरणात सुखावणारा गारवा निर्माण झाला.