माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांचे स्पष्टीकरण; माहितीतील त्रुटी दुरुस्त करण्याचे शाळांना निर्देश
Maharashtra Education News: राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संचमान्यतेची (Sanch Manyata) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संचमान्यतेच्या प्रक्रियेत राज्यातील तब्बल १ हजार ८९५ शाळांमध्ये विविध प्रकारच्या तांत्रिक व महितीविषयक त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे सुमारे ९० हजार ८४३ विद्यार्थ्यांच्या नोंदींवर आणि पर्यायाने शाळांच्या शिक्षक पदमंजुरीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
*पटसंख्येवर आधारलेली महत्त्वपूर्ण प्रक्रिया*
शाळांची संचमान्यता ही विद्यार्थ्यांच्या थेट पटसंख्येवर (Student Enrolment) आधारित असते. या प्रक्रियेद्वारेच शाळांमधील आवश्यक शिक्षक पदे, त्यांचे वेतन, पदमंजुरी आणि शाळेचे एकूण प्रशासकीय नियोजन निश्चित केले जाते. यापूर्वी शाळांना संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांच्या माहितीमध्ये त्रुटी राहिल्याने प्रशासनाने १० ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.
*माहिती तपासून दुरुस्ती करण्याचे शिक्षण संचालकांचे आवाहन*
विद्यार्थ्यांची पटनोंदणी करताना किंवा आधार अथवा वैयक्तिक माहिती भरताना त्रुटी राहिल्यास, अशा विद्यार्थ्यांची नोंद संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही, असे माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. केवळ अचूक आणि पडताळणीयोग्य (Verified) माहिती असलेल्या विद्यार्थ्यांचाच संचमान्यतेच्या गणनेत विचार केला जाणार आहे.

त्यामुळे सर्व संबंधित शाळा व्यवस्थापनांनी आणि मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात आणि दिलेल्या मुदतीत संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.













