धोपावे येथील तरुणावर कारवाई; वैद्यकीय तपासणीत अंमली पदार्थांचे सेवन निष्पन्न
गुहागर : गुहागर तालुक्यातील दाभोळ खाडीकिनारी असणाऱ्या नवानगर जेटी परिसरात रात्रीच्या वेळी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला गुहागर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवासी शेडमध्ये बसून करत होता गांजा सेवन :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर पोलीस ठाण्याचे अंमलदार गस्त घालत असताना शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास दाभोळ खाडीकिनारी नवानगर जेटीलगत असणाऱ्या प्रवासी पिकअप शेडमध्ये एक तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन पाहणी केली असता, हा तरुण प्रवासी शेडमधील कठड्यावर बसून गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आले.

वैद्यकीय तपासणीत निष्पन्न, मध्यरात्री गुन्हा दाखल :
पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत त्याच्या श्वासाला अंमली पदार्थाचा वास येत असल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल देण्यात आला. त्यानंतर गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल रमेश पवार (वय ३० वर्षे, ब.नं. १३९३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मध्यरात्री १:४५ वाजता आरोपी अभिजित नागेश पालशेतकर (वय ३० वर्षे, रा. धोपावे विघ्नहर्तावाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गु.र.नं. १०१/२०२६, एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) १९८५ चे कलम ८(क) आणि २७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.













