छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका रस्ता १५ मीटर रुंद होणार; जागा मालकांच्या शंकांचे निरसन करण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन
Chiplun Road Widening: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी चौक (चिंचनाका) ते बहादूरशेख नाका रस्ता रुंदीकरणाच्या नियोजनाने आता चांगलाच वेग घेतला आहे. रुंदीकरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणारी प्रत्यक्ष मोजणी आणि रेखांकनाचे काम मंगळवार, ६ ऑक्टोबरपासून तीन टप्प्यांत प्रत्यक्ष जागेवर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने संबंधित जागा मालकांना नोटिसा जारी केल्या असून प्राथमिक स्तरावर या कामाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे.
Chiplun Road Widening: तीन प्रमुख रस्ते होणार रुंद; वाहतूक कोंडीतून सुटका
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या ‘स्मार्ट सिटी’ नियोजनाअंतर्गत नगररचना (टीपी) विभागाच्या रेखांकनानुसार शहरातील तीन प्रमुख रस्ते रुंद केले जाणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका हा सुमारे २ किमी लांबीचा रस्ता १५ मीटर रुंद होणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी चौक ते पॉवर हाऊस हा मार्ग १५ मीटर, तर शिवाजी चौक ते बाजारपेठ हा रस्ता सुमारे १२ मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित आहे. हे रस्ते रुंद झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.
जागा मालकांनी घेतली मुख्याधिकारी व नगराध्यक्षांची भेट
रस्ता रुंदीकरणात नेमकी किती जागा संपादित केली जाणार, त्या बदल्यात भरपाई रक्कम मिळणार की वाढीव क्षेत्रफळ (FSI) दिले जाणार, यांबाबत बाधित मालमत्ताधारकांमध्ये संभ्रमावस्था होती. सोमवारी नगर परिषदेची सभा होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी चौक ते पॉवर हाऊस परिसरातील जागा मालकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची भेट घेऊन आपल्या शंका उपस्थित केल्या. या समस्यांचे योग्य निवारण झाल्याशिवाय सहकार्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर बोलताना नगराध्यक्ष सकपाळ यांनी नागरिकांच्या सर्व शंका व तक्रारींचे योग्य पद्धतीने निरसन केले जाईल, असे आश्वासन दिले.
मोजणी आणि रेखांकनाचे तीन टप्प्यांतील वेळापत्रक
नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान तीन टप्प्यांत सकाळी १० वाजल्यापासून मोजमाप व रेखांकन केले जाणार आहे:
- ६ ऑक्टोबर (मंगळवार): बहादूरशेख नाका ते राजू भागवत घर (काविळतळी)
- ७ ऑक्टोबर (बुधवार): भागवत घर ते यु. ई. स्कूल (मार्कंडी)
- ८ ऑक्टोबर (गुरुवार): यु. ई. स्कूल ते छत्रपती शिवाजी चौक
गेल्या सहा महिन्यांपासून नोटीस देणे, तक्रारींचे निरसन करणे आणि निधीची उपलब्धता करणे यात रखडलेल्या या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष रेखांकनाच्या कारवाईने मोठा वेग मिळाला आहे.














