रत्नागिरी जिल्ह्यातील ६८.९८ टक्के शिक्षकांची ई-केवायसी पूर्ण; प्रलंबित कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याची टांगती तलवार
Ratnagiri e-KYC Progress: रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक व केंद्रप्रमुखांच्या ई-केवायसी प्रक्रियेत राजापूर तालुका अत्यंत पिछाडीवर पडला आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत राजापूर तालुक्यातील एकाही शिक्षकाची किंवा केंद्रप्रमुखाची ई-केवायसी फॉरवर्ड झालेली नसून तालुक्याची टक्केवारी शून्य नोंदवली गेली आहे. याउलट मंडणगड तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी करत ९३.५८ टक्के कामासह जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्यात अद्याप १ हजार ६४४ शिक्षक व कर्मचाऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून एकूण सरासरी ६८.९८ टक्क्यांवर अडकली आहे.
Ratnagiri e-KYC Progress: १,१३९ कर्मचाऱ्यांकडून प्रस्ताव फॉरवर्डच नाही
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील ५ हजार ३०० कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार ६३ प्राथमिक शिक्षक आणि २३७ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. यापैकी ४ हजार १६१ कर्मचाऱ्यांनी आपले प्रस्ताव फॉरवर्ड केले असून ३ हजार ६५६ प्रस्तावांना मंजुरी (अप्रूव्हल) मिळाली आहे, तर १७० प्रस्ताव रिजेक्ट झाले आहेत. सध्या ३३५ प्रस्ताव तपासणी स्तरावर प्रलंबित आहेत. मात्र सर्वात चिंतेची बाब म्हणजे १,१३९ कर्मचाऱ्यांनी अद्याप आपले प्रस्ताव फॉरवर्डच केलेले नाहीत. राजापूर तालुक्यातील ६३५ प्राथमिक शिक्षक आणि ३२ केंद्रप्रमुख अशा एकूण ६६७ जणांपैकी एकानेही प्रस्ताव फॉरवर्ड केलेला नाही.
तालुकानिहाय ई-केवायसी स्थितीची आकडेवारी
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची प्रलंबित संख्या व पूर्ण कामाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे:
| तालुका | प्रलंबित संख्या | पूर्ण कामाची टक्केवारी (%) |
| मंडणगड | १७ | ९३.५८% |
| दापोली | ६७ | ८८.६८% |
| लांजा | ५० | ८९.२७% |
| गुहागर | ५७ | ८६.४०% |
| रत्नागिरी | १०४ | ८६.१०% |
| चिपळूण | २३० | ६८.५४% |
| संगमेश्वर | १०३ | ८५.६३% |
| खेड | ३४९ | ४९.७८% |
| राजापूर | ६६७ | ०.००% |
| एकूण/सरासरी | १,६४४ | ६८.९८% |
ऑक्टोबर-नोव्हेंबरचा पगार रोखला जाण्याची शक्यता
संगमेश्वर तालुक्यातील ३५ केंद्रप्रमुखांपैकी एकानेही ई-केवायसी फॉरवर्ड न केल्याने प्रशासनात नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि तालुकाप्रमुखांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पत्र पाठवण्यात आले होते. ज्या शिक्षक आणि केंद्रप्रमुखांची ई-केवायसी प्रलंबित राहील, त्यांचा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा पगार रोखण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आता शासनाकडून या प्रक्रियेला मुदतवाढ मिळते की शिक्षकांचे वेतन रोखले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 06-10-2026














