बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित धनादेश अनादर प्रकरणांचा होणार निपटारा; जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये आयोजन
Ratnagiri Special Lok Adalat: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे येत्या २१ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष लोकअदालतीचे (Special Lok Adalat) आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष लोकअदालत रत्नागिरीतील जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच वेळी पार पडणार आहे.
Ratnagiri Special Lok Adalat: चेक बाऊन्सची प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार
या विशेष लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने न्यायालयातील प्रलंबित बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित धनादेश अनादर (Cheque Bounce) प्रकरणे तडजोडीने आणि परस्परसंमतीने निकाली काढण्यात येणार आहेत. दीर्घकाळ न्यायालयात रेंगाळणारे वाद तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
पक्षकारांनी लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन
नागरिकांनी व पक्षकारांनी या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद यशवंतराव जाधव यांनी केले आहे.
पक्षकारांनी आपली प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवण्यासाठी आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याशी वेळेत संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र रामचंद्र पाटील यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 06-10-2026














