Chiplun: चिपळुणातील विभा अरविंद ग्रंथालयात गांधी व शास्त्री जयंतीसह ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

ज्येष्ठ कवी अभिजीत पिसे यांच्या कवितांचे वाचन; ग्रंथालयात ७ हजार पुस्तकांचा समृद्ध संग्रह उपलब्ध असल्याचा बापूसाहेब काणे यांचा दावा

Vibha Arvind Library Chiplun: शहरातील खेंड, चिपळूण येथील विभा अरविंद ग्रंथालयात महात्मा गांधी जयंती, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती तसेच मराठी अभिजात भाषा गौरव दिन विविध साहित्यिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस, ज्येष्ठ कवी अभिजीत पिसे, ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब काणे आणि संचालक मंडळाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Vibha Arvind Library Chiplun: अहिंसा आणि गांधी विचारांची आजच्या काळात गरज – प्रा. विनायक होमकळस

यावेळी प्रा. विनायक होमकळस यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. अहिंसेच्या तत्त्वाचा जगभर स्वीकार झाला असून, हातात शस्त्र न घेता लढा जिंकणारा योद्धा म्हणून गांधीजींचे कार्य अजरामर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्येष्ठ कवी अरुण इंगवले यांनीही गांधीजींच्या जीवनकार्याचे वाचन केल्यानंतर त्यांच्या विचारांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला, यावर भाष्य केले.

पुस्तक चळवळीला चालना अन् ७ हजार पुस्तकांचा समृद्ध संग्रह

ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब काणे यांनी प्रास्ताविकात ग्रंथालयाच्या वाटचालीची माहिती दिली. गेल्या चार महिन्यांपासून खेंड परिसरात पुस्तक चळवळीला चालना देण्याचे काम सुरू असून, पुस्तकप्रेमींकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादा मुळे ग्रंथालयात सुमारे सात हजार पुस्तकांचा समृद्ध संग्रह उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी आगामी काळात विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

कवी पिसे यांच्या कवितांनी आणली साहित्यिक रंगत; कार्यकारिणीत बदल

मराठी अभिजात भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ दैनिक ‘सागर’मधून काव्यलेखन करणाऱ्या ज्येष्ठ कवी अभिजीत पिसे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या निवडक कवितांचे वाचन करून उपस्थितांची दाद मिळविली. नवकवी विजय कदम यांनी कविता सादर केली, तर दीपक महाडिक यांनी कवी गुरू ठाकूर यांच्या कवितेचा रसास्वाद घडवला.

Shanti 3

कार्यक्रमा दरम्यान ग्रंथालय चळवळीतील मार्गदर्शिका सौ. गौरी भोसले यांनी वैयक्तिक कारणास्तव संचालिका पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी सौ. मुग्धा मोरे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी दोन्ही महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात विभा अरविंद ग्रंथालयाने सहकार्य करावे, असे आवाहन आंबेडकर वाचनालयाचे सुनील खेडेकर यांनी केले.

कार्यक्रमास कोषाध्यक्ष विनायक ओक, सौ. मेघा बेटकर, प्रा. विकास मेहेंदळे, प्रसाद रिसबूड, प्रकाश गांगण, सुहास चव्हाण, ग्रंथपाल कु. सुप्रिया खोत, सौ. पूर्वा कांबळे, मंगेश वेस्वीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप कार्यवाह विजय कदम यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 06-10-2026