नगरसेविका वर्षा ढेकणे यांचा पुढाकार; महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा संकल्प
Ward 15 Beauty Parlour Training: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या विशेष पुढाकारातून प्रभागातील महिलांसाठी तीन दिवशीय मोफत ब्युटी पार्लर व मेकअप प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६, ७ व ८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या शिबिराचे औपचारिक उद्घाटन सौ. वर्षा ढेकणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
Ward 15 Beauty Parlour Training: महिला सक्षमीकरण अन् स्वावलंबनावर भर
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सौ. वर्षा ढेकणे यांनी प्रभाग क्रमांक १५ मध्ये महिला आणि नागरिकांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिलांनी नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, घरातूनच छोटा-मोठा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, याच मुख्य उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘खुशी ब्युटी पार्लर’चे सहकार्य; प्रात्यक्षिकांसह मिळणार धडे
या तीन दिवशीय मोफत प्रशिक्षणासाठी ‘खुशी ब्युटी पार्लर’चे विशेष सहकार्य लाभले आहे. सौ. सुचिता प्रवीण ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी महिलांना ब्युटी पार्लर आणि आधुनिक मेकअपचे प्रत्यक्ष (प्रॅक्टिकल) प्रशिक्षण दिले जात आहे.
महिलांच्या अंगभूत कलागुणांना व कौशल्याला योग्य दिशा मिळावी यासाठी भविष्यातही प्रभागात विविध मोफत कौशल्य विकास शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी उपक्रम आणि महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम सातत्याने राबवले जातील, असा विश्वास नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी व्यक्त केला. तसेच प्रभागातील महिलांनी या मोफत संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकावे, असे आवाहनही करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 06-10-2026














