वाढलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका वाढल्याने प्रवाशांची होती नाराजी; साफसफाईमुळे वाहनचालकांना मोठा दिलासा
Devrukh Pangri Road Clearing: देवरूख-पांगरी-रत्नागिरी मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाढलेले गवत आणि झाडी-झुडपे वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याबाबत वृत्त गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले होते. या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, सोमवारी या मार्गावरील वाढलेले गवत व झाडी हटवण्याच्या प्रत्यक्ष साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कडेला झाडी-झुडपे अस्ताव्यस्त वाढल्यामुळे अनेक ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे वाहनचालकांसाठी अत्यंत कठीण बनले होते. विशेषतः तीव्र वळणे आणि उताऱ्याच्या ठिकाणी झाडी थेट रस्त्यावर आल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. पावसाळ्यानंतर वाढलेल्या गवतामुळे मुख्य रस्ता अधिकच अरुंद झाला होता. याबाबत प्रवाशांकडून व वाहनधारकांकडून सातत्याने तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
‘सकाळ’ने या गंभीर समस्येकडे वृत्ताच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर सोमवारी तातडीने कर्मचाऱ्यांमार्फत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडपे आणि अडथळा ठरणारी झाडी हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले.
वाहतुकीची सुरक्षितता वाढणार; वाहनचालकांत समाधान
प्रशासनाने तातडीने केलेल्या या कारवाईमुळे देवरूख-पांगरी-रत्नागिरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्ता मोकळा आणि सुटसुटीत झाल्यामुळे आता वळणांवर स्पष्ट दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) मिळणार असून, या मार्गावरील वाहतुकीची सुरक्षितता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.














