Ratnagiri RTO Choice Number: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे दुचाकींची नवीन मालिका ‘MH-08-BP’ सुरू; पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया जाहीर

पारदर्शक लिलाव पद्धत आणि १८० दिवसांची मुदत; उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांची माहिती

Ratnagiri RTO Choice Number: रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (RTO) दुचाकी वाहनांसाठी ‘MH-08-BP-0001 ते MH-08-BP-9999’ ही नवीन नोंदणी मालिका ६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे. या नव्या मालिकेतील व्हीआयपी, आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक (Choice Number) मिळवण्यासाठी वाहनधारकांसाठी अर्ज सादर करणे व लिलाव प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा तसेच कार्यालयीन व्यवस्थेवर ताण न पडता इच्छुकांना पारदर्शक पद्धतीने पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा, यासाठी ही विशेष कार्यपद्धती राबविण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.

अर्ज प्रक्रिया व लिलावाचे वेळापत्रक

१. चारचाकी व इतर वाहनांसाठी (तीनपट शुल्क भरून)

ज्या चारचाकी अथवा इतर परिवहन वाहनधारकांना या नव्या दुचाकी मालिकेतील पसंतीचा क्रमांक हवा असेल, त्यांना तीनपट शुल्क भरून हा क्रमांक मिळवता येईल:

  • अर्ज सादर करणे: ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत.
  • यादी प्रसिद्धी: ६ ऑक्टोबर रोजीच सायंकाळी ०३:०० वाजता नोटीसबोर्डवर.
  • लिलाव प्रक्रिया: एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास जादा रकमेचा डीडी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात जमा करावा लागेल. सायंकाळी ०४:३० वाजता लिफाफे उघडून सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास तो क्रमांक वितरीत केला जाईल.

२. दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक क्रमांक

  • अर्ज सादर करणे: ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत.
  • यादी प्रसिद्धी: ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०३:०० वाजता.
  • लिलाव प्रक्रिया: एकापेक्षा जास्त दावेदार असल्यास जादा रकमेच्या डीडीद्वारे सीलबंद पाकिटात बोली लावून सायंकाळी ०४:३० वाजता सर्वाधिक बोली लावणाऱ्या अर्जदारास क्रमांक दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रे आणि नियम

१. आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराने आरटीओ कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्ड (PAN Card) यांच्या साक्षांकित प्रती आणि विहित शुल्काचा डीडी सादर करणे अनिवार्य आहे. २. डीडी कोणाच्या नावे असावा: राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेचा डीडी ‘DY RTO RATNAGIRI’ यांच्या नावे आणि रत्नागिरी येथे देय (Payable at Ratnagiri) असावा. ३. मुदत व अटी: एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक कोणत्याही परिस्थितीत बदलून दिला जाणार नाही. क्रमांक आरक्षित केल्याच्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास तो क्रमांक आपोआप रद्द होईल आणि भरलेले शुल्क शासनजमा होईल.

Shanti 3

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:22 06-10-2026