Navratri Utsav 2026 Shir Ramvardayini: निरबाडे, खांदाट-पाली आणि काडवलीच्या श्री रामवरदायिनी मंदिरात नवरात्रौत्सव; ११ ऑक्टोबरला घटस्थापना

श्री रामवरदायिनी देवस्थानात १० दिवस धार्मिक पर्वणी; २० ऑक्टोबरला सीमोल्लंघन

चिपळूण : Navratri Utsav 2026 Shir Ramvardayini च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील निरबाडे, खांदाट-पाली (ता. चिपळूण) आणि काडवली (ता. खेड) परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रामवरदायिनी देवस्थान मंडळाच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा केला जाणार आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने या उत्सवाला प्रारंभ होणार असून, मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दसरा व सीमोल्लंघनाने उत्सवाची सांगता होईल.

Navratri Utsav 2026 Shir Ramvardayini: विविध वाड्यांचा जागर अन् धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक विधींसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निरबाडे, पाली, खांदाट आणि काडवली परिसरातील विविध वाड्यांकडे जागराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे:

  • ११ ऑक्टोबर (रविवार): घटस्थापना; पाली खालचीवाडी व खांदाट भोईवाडी यांच्यातर्फे जागर, गोंधळ व भजन.
  • १२ ऑक्टोबर (सोमवार): पाली मधलीवाडी व खांदाट गवळवाडी यांचा जागर.
  • १३ ऑक्टोबर (मंगळवार): पाली वरचीवाडी व पाली भुवडवाडी यांचा जागर.
  • १४ ऑक्टोबर (बुधवार): निरबाडे पश्चिमवाडी व काडवली गजवाडी तर्फे कार्यक्रम.
  • १५ ऑक्टोबर (गुरुवार): निरबाडे चौरसवाडी व काडवली काजवेवाडी तर्फे जागर; तसेच ‘होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन.
  • १६ ऑक्टोबर (शुक्रवार): निरबाडे पूर्ववाडी व निर्मळवाडी यांचा जागर.
  • १७ ऑक्टोबर (शनिवार): काडवली कसुचरवाडी व झगडेवाडी तर्फे जागर, गोंधळ व भजन.
  • १८ ऑक्टोबर (रविवार): काडवली चौरसवाडी व हुमणेवाडी तर्फे गोंधळ आणि भजन.
  • १९ ऑक्टोबर (सोमवार): काडवली कांगणेवाडी, डांगेवाडी व संपूर्ण चारगाव परिसराच्या सहभागाने ग्रहयज्ञ व धार्मिक विधी.
  • २० ऑक्टोबर (मंगळवार): काडवली हिरवेवाडी व निरबाडे देऊळवाडी तर्फे जागर; दुपारी २ नंतर दसरा उत्सव व सीमोल्लंघन सोहळा.

नाचाचा जंगी सामना: १७ ऑक्टोबरला जुगलबंदी

शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता भाविकांसाठी नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शक्तीवाले शाहीर साक्षी शिंदे (गोमले, कोंडीवली, ता. खेड – भानुदास घराण्याचे गुरुवर्य विक्रम केरू साधू दादा यांच्या पट्टशिष्या कवी शाहीर गणेश शिंदे यांची सुकन्या, ‘कोकण कलारत्न’ पुरस्कारप्राप्त) आणि तुरेवाले शाहीर रत्नाकर महाकाळ (गोठलवाडी, मुरडे – रामचंद्र पंडित घराण्यातील विजय राजेंद्र यांचे शिष्य) यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

देवस्थान मंडळाचे आवाहन: भाविकांसाठी मंदिरात विशेष सोय

भाविकांच्या सोयीसाठी देवीच्या ओटीचे साहित्य (हिरवी साडी, खण व नारळ) मंदिरातच उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामवरदायिनी देवस्थान मंडळ, उत्सव कमिटीचे पदाधिकारी, ट्रस्टी व मौजे निरबाडे, पाली, खांदाट आणि काडवली येथील ग्रामस्थांनी केले आहे.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 08-10-2026