Navratri Utsav 2026 Terav Bhavani Waghjai: श्री क्षेत्र टेरव येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

‘ब’ दर्जा प्राप्त टेरव तीर्थक्षेत्रात नवरात्रोत्सव पर्वणी

रत्नागिरी: Navratri Utsav 2026 Terav Bhavani Waghjai च्या पार्श्वभूमीवर पदसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव (ता. चिपळूण) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रविवार, ११ ऑक्टोबर ते सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक विधी, पूजन तसेच पारंपरिक रूढी-परंपरांनुसार हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

Navratri Utsav 2026 Terav Bhavani Waghjai: वारानुसार नवरंगांच्या साड्या अन् सोन्या-चांदीचे अलंकार

उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट तसेच पालखीची विशेष आरास करण्यात येणार आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांत श्री भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कालकाई आणि कुलस्वामिनी देवींच्या मूर्तींना वारानुसार नवरंगांच्या साड्या नेसवून सोन्या-चांदीच्या मौल्यवान अलंकारांनी सालंकृत करण्यात येईल. देवींची ही विविध रूपे भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.

कृष्णशिळेतील साडेसात फूट उंचीची श्री भवानीमाता अन् नवदुर्गांची स्थापना

श्री क्षेत्र टेरव येथील मंदिरात कृष्णशिळेतील सुमारे ७.५ फूट उंचीची श्री भवानीमातेची अत्यंत आकर्षक मूर्ती आहे. या मुख्य मंदिरामध्ये गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार तसेच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या नवदुर्गांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान अन् धार्मिक पर्यटनाचे केंद्र

भैरी-भवानी आणि नवदुर्गांचे एकाच ठिकाणी दर्शन घडणारे हे महाराष्ट्रातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान मानले जाते. कोकणातील दाक्षिणात्य वास्तुशैलीत उभारलेले मंदिर, भव्य गोपुरे, आकर्षक देवतामूर्ती, मनमोहक उद्यान, देवराईतील हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणामुळे हे स्थळ धार्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित झाले आहे. या क्षेत्राला महाराष्ट्र शासनाने यात्रास्थळ व पर्यटनाचा ‘क’ दर्जा आणि तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा बहाल केला आहे.

Arihant 1

भाविकांसाठी ओटीचे साहित्य मंदिरात उपलब्ध; उपस्थित राहण्याचे आवाहन

नवसाला पावणारी आणि संकटविमोचक देवी म्हणून ख्याती असलेल्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे हजेरी लावतात. उत्सव काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार असून, भाविकांच्या सोयीसाठी ओटीचे साहित्य मंदिरातच उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 08-10-2026