जिल्ह्यात ५० नवीन विहिरींना मंजुरी; तालुक्यात १० हजार वनराई बंधारे बांधणार
रत्नागिरी :
Ratnagiri Pani Tanchai Nivarana Arakhada अंतर्गत रत्नागिरी तालुक्यात आगामी उन्हाळ्यात जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २ कोटी ६० लाख रुपयांच्या टंचाई निवारण कृती आराखड्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. तालुका टंचाई निवारण आराखडा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत यांनी टंचाई निवारणात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा करणाऱ्या प्रशासकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा सज्जड इशारा दिला आहे.
Ratnagiri Pani Tanchai Nivarana Arakhada: तालुक्यातील ७४ गावे आणि १३७ वाड्यांसाठी विशेष नियोजन
रत्नागिरी तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत; मात्र अनेक प्रशासकांनी गावातील टंचाई आराखडेच तयार करून सादर केले नसल्याचे बैठकीत समोर आल्याने पालकमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमधील ७४ गावे आणि १३७ वाड्यांसाठी हा २ कोटी ६० लाखांचा संभाव्य टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला असून पंचायत समितीच्या शामराव पेजे सभागृहात ही आढावा बैठक पार पडली.
१० हजार वनराई बंधाऱ्यांचा संकल्प आणि ५० नवीन विहिरींना मंजुरी
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येत्या १५ तारखेला सकाळी ८ वाजता तालुक्यात ठिकठिकाणी १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण ५० नवीन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. ‘जलजीवन मिशन’ आणि ‘१५ वा वित्त आयोग’ यांच्या निधीचा प्रभावी वापर करून टंचाईग्रस्त गावांना तात्काळ दिलासा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीस जि. प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, सीईओ वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके व इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 08-10-2026














