Seva Sankalp Abhiyan Ratnagiri: ‘महिला-बालकल्याण’ची सेवा संकल्पातून जनजागृती; जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन

शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष मार्गदर्शन सत्रे

रत्नागिरी :
Seva Sankalp Abhiyan Ratnagiri अंतर्गत महिला व बालविकास विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि हेल्पलाईनची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

Seva Sankalp Abhiyan Ratnagiri: शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष मार्गदर्शन सत्रे
या अभियानांतर्गत रत्नागिरी सखी सेंटरच्या माध्यमातून गोदुताई जांभेकर विद्यालय, एम. एस. नाईक हायस्कूल, आबासाहेब मराठे कला व वाणिज्य महाविद्यालय (हातीवले, राजापूर), जागुष्टे हायस्कूल, पुनस हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, माध्यमिक विद्यालय जुवाठी, रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १ व यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेज यांसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली आहेत. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे दुष्परिणाम, मासिक पाळी व्यवस्थापन, कौशल्य विकास, तसेच महिलांचे हक्क व कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांसाठी सक्षमीकरण मेळावे व स्वाक्षरी मोहीम
रत्नागिरी शहर व परिसरातील भाट्ये, काळबादेवी आणि उद्यमनगर झोपडपट्टी भागातील महिलांसाठी विशेष महिला सक्षमीकरण मेळावे घेण्यात आले. तसेच रत्नागिरीचा राजा मंडळ, रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली, ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कल्याणकारी योजना व हेल्पलाईनची माहिती
अभियानातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, सखी वन स्टॉप सेंटर, सखी निवास, महिला समुपदेशन केंद्र आणि बालसुरक्षा यंत्रणा यांसारख्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जात आहे. आपत्कालीन मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ आणि महिला हेल्पलाइन १८१ यांचीही माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले आहे.

Arihant 2

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 08-10-2026