Pali Housebreak News: पाली-मराठवाडीत भरदिवसा घरफोडी; ७ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले

भाजीपाल्यासाठी आठवडा बाजारात गेलेल्या महिलेच्या घरातून ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

Pali Housebreak News रत्नागिरी तालुक्यातील पाली-मराठवाडी येथे एका बंद घराच्या मागील गेटमधून प्रवेश करत अज्ञात चोरट्याने ७ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. ही घरफोडी बुधवारी दुपारी १२.३० ते १.४५ च्या सुमारास भरदिवसा घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मीनाक्षी अविनाश जाधव (वय ४५, रा. पाली मराठवाडी, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या बुधवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास घर बंद करून पाली येथील आठवडा बाजारात भाजीपाला व घरातील जिन्नस खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. याच कालावधीत अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या पाठीमागील लोखंडी गेटचे कुलूप तोडून तसेच दरवाजाचे बिजागर तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून मुद्देमाल लांबवला. यात ५ तोळे वजनाच्या पाटल्या, ५ ग्रॅमचे सोन्याचे वळे, ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅमचे दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा ग्रॅमचे गळ्यातील लॉकेट, २ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, १ ग्रॅमची सोन्याची कानातील वेल, १ नाकातील सोन्याची पुली आणि चांदीचे पैंजण असा एकूण ६ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला.

दुपारी १.४५ वाजता मीनाक्षी जाधव घरी परत आल्यावर त्यांना घरातील कपाटाचे लॉकर फुटलेले आणि चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती देऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे करत आहेत.

Tata aeris

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 09-10-2026