बंगळुरू येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरीच्या सुपुत्रीचा डंका; महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे नाव आशियाई खंडात उज्ज्वल
Gauri Milke Asian Masters Swimming स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकित जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी नोंदवली आहे. बंगळुरू येथे ४ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मास्टर्स आशियाई जलतरण स्पर्धेत (Asian Masters Swimming Championship) गौरी मिलके यांनी २०० मीटर बॅकस्ट्रोक या आव्हानात्मक क्रीडा प्रकारात आशिया खंडात चौथा क्रमांक पटकावला आहे.
शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत गौरी मिलके यांनी उत्कृष्ट जलतरण कौशल्याचे प्रदर्शन करत ही लक्षणीय कामगिरी केली. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशामुळे केवळ रत्नागिरी जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव आशियाई क्रीडा वर्तुळात अभिमानाने गाजले आहे.
गौरी मिलके या रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या संचालिका असून त्यांनी अनेक नवोदित जलतरणपटूंना घडवले आहे. त्यांच्या या यशामागे त्यांचे सासरे शंकरराव मिलके आणि पती तथा प्रशिक्षक महेश मिलके यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 09-10-2026














