रत्नागिरी ते साखरतर मार्गावर घडली घटना; रत्नागिरी शहर पोलिसांकडून अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल
Ratnagiri Hit and Run Case: (रत्नागिरी) शहरानजीकच्या रत्नागिरी ते साखरतर मार्गावरील शिरगाव गडगेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेने पायी जाणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीला भरधाव चारचाकी वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला आहे. धडक दिल्यानंतर मदत करण्याऐवजी चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र मोहन नागवेकर (वय ५२, रा. शिरगाव गडगेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
*नेमकी घटना कशी घडली?
*प्राप्त माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास रवींद्र नागवेकर हे शिरगाव गडगेवाडी बसस्थानकाकडून श्रद्धा पेट्रोल पंपाच्या दिशेने रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी चालत जात होते. त्याच वेळी रत्नागिरीकडून साखरतरच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाच्या (क्रमांक MH 08 – 2769, उर्वरित क्रमांक अज्ञात) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत गाडी भरधाव, अविचाराने व निष्काळजीपणे चालवली.

सदर चारचाकीने रस्त्यावरून चालणाऱ्या नागवेकर यांना जोरदार धडक दिली. या धडकेत नागवेकर रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला, पायाला व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर जखमीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्याऐवजी चालक गाडीसह पसार झाला.
*पोलीस हेडकॉन्स्टेबलच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
*या अपघाताची दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष अशोक भालेकर (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा (MVA) कलम १८४ आणि १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रत्नागिरी शहर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अंशतः मिळालेल्या गाडीच्या क्रमांकाच्या आधारे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेत आहेत.













