NSS Camp च्या समारोपात स्वयंसेवकांचा गौरव; सामाजिक बांधिलकी व श्रमप्रतिष्ठेचे मान्यवरांकडून मार्गदर्शन
NSS Camp च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने सोनवडे येथे आयोजित केलेले सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा. आतिश माईनकर यांचे व्याख्यान झाले, तर पारितोषिक वितरण आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा नेहा जोशी, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सनगरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सरिता सोलकर, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, शिक्षिका सुलेखा मोहिते, ग्रामस्थ राजन खेडेकर, क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर आणि भागडे काका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नाली झेपले यांनी केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रा. मयुरेश राणे यांनी सात दिवसांत राबविण्यात आलेल्या श्रमदान, सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीपर उपक्रमांचा सविस्तर अहवाल सादर केला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिबिरादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बालदिनानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह शिबिरातील सहभाग, जबाबदारीची जाणीव, शिस्त, नेतृत्वगुण आणि कामगिरीच्या आधारे स्वयंसेवकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.














