कोजागिरी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत महिनाभर धार्मिक सोहळा; हजारो गणेशभक्तांची उपस्थिती
Ganpatipule Deepotsav ची सांगता रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात परंपरेनुसार आश्विन पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा) ते कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) या कालावधीत साजरी झाल्यानंतर भक्तीमय वातावरणात पार पडली. शके १९४८ मधील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान हा दिव्यांचा उत्सव दररोज धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. महिनाभर चालणाऱ्या या पारंपरिक उत्सवाची जय्यत तयारी आणि नियोजन संस्थान पंचकमिटी तसेच पुजारी यांच्या मार्फत प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात आले होते.
या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता तेलाच्या दिव्यांनी आणि पणत्यांनी संपूर्ण मंदिर आणि परिसर प्रकाशित करण्यात येत होता. आरती, मंत्रपुष्प आणि प्रार्थना पार पडल्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप होऊन प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होत असे.
विशेष म्हणजे, मंदिरातील विद्युत ऊर्जेवरील सर्व दिवे, पंखे व विद्युत रोषणाई आरतीच्या कालावधीदरम्यान नेहमीप्रमाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे केवळ तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशाने मंदिर परिसरातील वातावरण तेजोमय झाले होते.

Ganpatipule Deepotsav सांगता सोहळ्यातील प्रमुख वैशिष्ट्ये
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पार पडलेल्या सांगता सोहळ्यात मंदिराचा गाभारा आणि त्रिपुर उजळण्यात आले होते. यासोबतच मंदिर आणि संपूर्ण परिसरात सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त तेलाचे दिवे आणि पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या.
या दीपोत्सव आणि सांगता सोहळ्याला उपस्थित राहून हजारो गणेशभक्त भाविकांनी या आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर यांनी दिली.













