भरधाव डिओ चालकाने धडक दिल्याने घडली दुर्घटना; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल
Lanja Two-Wheeler Accident: (लांजा, जिल्हा रत्नागिरी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुवे पुरागाव हद्दीत दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात मनोहर सिताराम गुरव (वय ५४, रा. वनगुळे-गुरववाडी, ता. लांजा) यांचा मृत्यू झाला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वारावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*नेमकी घटना कशी घडली?
*मिळालेल्या माहितीनुसार, मयत मनोहर गुरव हे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील मेस्ट्रो दुचाकीवरून (क्रमांक MH 08 AC 1889) मुंबई-गोवा महामार्गावरून वनगुळे गावाकडे जात होते. ते कुवे पुरागाव हद्दीत आले असता, मागून गोवा दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या डिओ दुचाकीने (क्रमांक MH 08 AM 9227) त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली.
रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, अतिवेगात व निष्काळजीपणे गाडी चालवल्याने ही भीषण धडक बसली. धडकेमुळे मनोहर गुरव हे रस्त्यावर जोरदार फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

*लांजा पोलिसांत गुन्हा दाखल; चालकही जखमी
*या अपघाताप्रकरणी मयताचे जावई सुहास सखाराम भोवड (वय ३४, सध्या रा. वनगुळे, मूळ रा. डोंबिवली) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून डिओ दुचाकी चालक प्रथमेश रमेश करंबळे (वय २६, रा. आगरवाडी, लांजा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ सह मोटार वाहन कायदा (MVA) कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अपघातात संशयित आरोपी प्रथमेश करंबळे हादेखील जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.













