अंधाराचा फायदा घेऊन वावरणाऱ्या तरुणाकडून स्क्रू ड्रायव्हर जप्त; शहर पोलिसांची कारवाई
Ratnagiri Suspicious Person Arrest: (रत्नागिरी) शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील प्रवेशद्वाराजवळ अंधाराचा फायदा घेऊन संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालिक कामील फणसोपकर (वय २६, रा. कोकण नगर, मजगाव रोड, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.
*नेमकी घटना कशी घडली?
*
मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.०५ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील प्रवेशद्वाराजवळील अंधाराचा फायदा घेऊन एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आला.
संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी व तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे २५ रुपये किमतीचा एक स्क्रू ड्रायव्हर (Screw Driver) सापडला.

रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा नोंद
एकांताच्या व अंधाराच्या ठिकाणी घरफोडी किंवा चोरीच्या उद्देशाने संशयास्पद साहित्यासह वावरत असल्याच्या संशयावरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित सालिक फणसोपकर याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत.













