आडिवरेची महाकाली; शक्ती, श्रद्धा आणि इतिहासाचा जागर..!

आदिवरेची महाकाली; शक्ती, श्रद्धा आणि इतिहासाचा जागर..!

समुद्रातून प्रगटल्याची आख्यायिका; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी, विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

*आडिवरे महाकाली: *कोकणाच्या समृद्ध धार्मिक परंपरेत राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थानाला अननसाधारण महत्त्व लाभले आहे. नवसाला पावणारी देवी अशी तीव्र श्रद्धा असलेल्या या शक्तिस्थानात नवरात्रोत्सवात भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. प्राचीन आख्यायिका, तीन देवींचे एकत्रित स्थान आणि ऐतिहासिक परंपरा यामुळे हे देवस्थान कोकणाच्या धार्मिक वैभवाची महत्त्वाची ओळख बनले आहे.

समुद्रातून प्रगट झाल्याची आख्यायिका
स्थानिक आख्यायिकेनुसार, सुमारे हजार वर्षांपूर्वी वेत्ये गावातील जाधव कुटुंबातील भंडारी समाजाचे लोक मासेमारीसाठी समुद्रात गेले असताना त्यांचे जाळे अडकले. त्याच रात्री त्यांच्या मूळ पुरुषाला स्वप्नात देवीचा दृष्टान्त झाला. "मी महाकाली आहे, मला वर घे," असा आदेश मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाळ्यात काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती आढळली. त्यानंतर वाडापेठ येथे देवीची दक्षिणाभिमुख स्थापना करण्यात आल्याची परंपरा सांगितली जाते.

या मंदिरामध्ये श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री महालक्ष्मी या तीन देवी एकाच ठिकाणी विराजमान आहेत. याशिवाय, परिसरात स्वयंभू श्री नगेश्वर यांचे प्राचीन शिवमंदिर तसेच श्री खळनाथ आणि श्री योगेश्वरी यांची मंदिरे देखील आहेत. प्रथमतः नगेश्वर, त्यानंतर महालक्ष्मी, खळनाथ, महाकाली आणि शेवटी महासरस्वतीचे दर्शन घेण्याची येथे परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या मंदिराला भेट दिल्याचे स्थानिक परंपरेत सांगितले जाते. तसेच आदिशंकराचार्यांनी देवीची स्थापना केल्याची आख्यायिकाही अत्यंत प्रसिद्ध आहे.

Shanti real estate 1

नवरात्रात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत आदिवरे येथे नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

या कालावधीत मंदिरामध्ये पूजापाठ, अभिषेक, आरती, कीर्तन, प्रवचन आणि पालखी प्रदक्षिणेचे आयोजन केले जाते.

यंदाच्या नवरात्रोत्सवात विशेष आकर्षण म्हणून दशअवतार, नमन, मंगलागौर स्पर्धा आणि शक्ती-तुरा नाचाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी आवर्जून येथे उपस्थित राहतात. सागरी महामार्गामुळे या भागातील पर्यटनालाही मोठी संधी उपलब्ध झाली असून मंदिराचे अलीकडेच करण्यात आलेल्या नूतनीकरणामुळे आणि आकर्षक कलाकुसरीमुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

राजापूरपासून सुमारे ३० किलोमीटर तर रत्नागिरीपासून ४२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या देवस्थानापर्यंत जाण्यासाठी सागरी महामार्गामुळे प्रवास अधिक सुलभ झाला आहे. भाविकांसाठी येथे भक्तनिवासाची सुविधाही उपलब्ध असून, आडिवरेची महाकाली हे श्रद्धा, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे उत्तम संगमस्थान आहे.