अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह कुटुंबियांचे केले सांत्वन; धोकादायक जलक्षेत्रात लहान मुलांना न सोडण्याचे नागरिकांना आवाहन
राजापूर / नाटे : नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील लहान मुलांचा खोल पाण्यात बुडून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
बेपत्ता मुलीसाठी स्वतः पोलीस अधीक्षकांनी बोटीतून राबवली शोधमोहीम :
रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, याच घरातील आणखी एक अल्पवयीन मुलगी अद्याप बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्वतः खाडीपात्रात बोटीतून उतरून शोधमोहिमेची पाहणी केली व प्रत्यक्ष सहभाग घेतला. नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस अंमलदार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अनेक लहान-मोठ्या बोटींच्या साहाय्याने दिवस-रात्र ही शोधमोहीम वेगाने राबवली जात आहे.

स्थानिक नागरिकांशी संवाद आणि खबरदारीचे आवाहन :
या दुर्दैवी घटनेनंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. समुद्रकिनारे, खाडीपात्रे, नद्या व अन्य जलक्षेत्रांमध्ये वावरताना नागरिकांनी स्वतःची व कुटुंबीयांची योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
लहान मुलांना धोकादायक जलक्षेत्रांकडे पाठवू नका :
पाण्याची खोली, पाण्याचा वेगवान प्रवाह तसेच समुद्रातील भरती-ओहोटीचा अचूक अंदाज न आल्यामुळे अशा जीवघेण्या दुर्घटना घडतात. त्यामुळे पालकांनी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत लहान मुलांना धोकादायक जलक्षेत्रांमध्ये एकटे सोडू नये, पाठवू नये अथवा अशा ठिकाणी जाण्यास सक्त मज्जाव करावा, असे कळकळीचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या वेळी केले.













