Ratnagiri Kasari Chaperi Bike Accident: कासारी-चाफेरी मार्गावर भीषण अपघात; एका तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

Ratnagiri Kasari Chaperi Bike Accident: कासारी-चाफेरी मार्गावर भीषण अपघात; एका तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

तीव्र उतारावर ताबा सुटल्याने दुचाकी दरीत कोसळली; मयत चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल

*रत्नागिरी: *तालुक्यातील कासारी ते चाफेरी मार्गावरील कासारी गवाणवाडी येथील तीव्र उतारावर रविवारी (११ ऑक्टोबर) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या सिमेंटच्या संरक्षक कठड्याला धडकून थेट खोल दरीत कोसळल्याने चालक अनुप सत्यनारायण शर्मा (वय २०, रा. शिगनजोरी, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मयत चालकाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीव्हीएस दुचाकीवरून खंडाळ्याकडे जाताना भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले तिघे तरुण रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीवरून (क्रमांक एम.एच. ०८ ए.आर. ६९२०) कासारी ते चाफेरी मार्गे खंडाळा येथे जाण्यासाठी निघाले होते. चालक अनुप शर्मा याने दुचाकीवर रूतिक शिवधनी पटेल (वय २३) आणि निरज कश्यप (वय २१) या दोघांना मागे बसवले होते. कासारी गवाणवाडी येथील तीव्र उतारावर दुचाकी आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेली दुचाकी रस्त्यालगतच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरदार आदळली.

Ratnagiri Kasari Chaperi Bike Accident: तिघेही थेट दरीत फेकले गेले; चालकाचा जागीच मृत्यू
हा आघात इतका भीषण होता की दुचाकीसह तिघेही रस्त्यावरून थेट खोल दरीमध्ये फेकले गेले. या अपघातात चालक अनुप शर्मा याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले रूतिक पटेल आणि निरज कश्यप हे दोघे गंभीर जखमी झाले.

Shanti real estate 1

मयत चालकाविरुद्ध जयगड पोलिसांत गुन्हा नोंद; पोलीस तपास सुरू
अपघातानंतर जखमी रूतिक पटेल याने जयगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मयत चालक अनुप शर्मा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १२८ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.