उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मोठी वाढ होणार; सप्टेंबर २०२६ मधील बेरोजगारीचा दर ५ टक्क्यांवर स्थिर
Indian Employment Update: भारतातील बेरोजगारीची समस्या आगामी काळात दूर होण्याच्या दृष्टीने एक दिलासादायक अहवाल समोर आला आहे. ताज्या अहवालानुसार, २०२५-३० या कालावधीत भारतातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील रोजगाराची स्थिती सुधारणार असून, २०३० पर्यंत ३५ कोटींहून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे देशातील बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर संपुष्टात येण्याच्या मार्गावर असेल.
इंडिया डिडॅक्टिक्स असोसिएशनने (IDA) वर्तवलेल्या या अंदाजानुसार, या नवीन संधींचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी देशातील तरुणांना योग्य प्रशिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि कामाशी संबंधित व्यावहारिक ज्ञान (Practical Knowledge) देणे अत्यंत आवश्यक ठरेल. कंपन्यांना अशा कर्मचाऱ्यांची गरज आहे, ज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे. त्यामुळे उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चांगला समन्वय असण्याची गरज ‘आयडीए’ने अधोरेखित केली आहे.
सप्टेंबर २०२६ मधील बेरोजगारीची आकडेवारी
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या नवीन आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२६ मध्ये भारतातील एकूण बेरोजगारीचा दर ५ टक्के इतका नोंदवला गेला, जो ऑगस्ट २०२६ च्या दराएवढाच कायम राहिला आहे.

ग्रामीण बेरोजगारी: ऑगस्ट २०२६ मधील ४.१ टक्क्यांवरून वाढून सप्टेंबरमध्ये ४.२ टक्क्यांवर पोहोचली.
शहरी बेरोजगारी: ऑगस्ट २०२६ मधील ६.८ टक्क्यांवरून किंचित वाढून सप्टेंबरमध्ये ६.९ टक्के झाली.
मात्र, गतवर्षीच्या तुलनेत विचार केल्यास राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार (PLFS), सप्टेंबर २०२५ मधील ५.२ टक्क्यांवरून घटून सप्टेंबर २०२६ मध्ये एकूण बेरोजगारीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. तसेच याच कालावधीत ग्रामीण बेरोजगारीचा दर ४.६ टक्क्यांवरून ४.२ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, ग्रामीण महिला बेरोजगारीचा दरही नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. शहरी भागात मात्र बेरोजगारीचा दर जवळपास स्थिर राहिला आहे.













