महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थांची बैठक; १६ नोव्हेंबरपासून रस्ते काम सुरू करण्याचे आश्वासन
Khed Khadipatta News अंतर्गत, खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सातत्याने भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीजखांब, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर, वाढीव वीजबिले आणि रखडलेली रस्त्यांची कामे यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) राजवेल येथे एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
महावितरण व बांधकाम विभागाच्या अडचणींवर तोडगा
राजवेल येथे मेहमूद दाऊद हमदुले यांच्या निवासस्थानी सायंकाळी पार पडलेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वप्नील पाटील, शाखा अभियंता नीलेश माळी तसेच महावितरणचे अभियंता वेळमकर व बडगुजर यांच्यासह खाडीपट्टा भागातील सुमारे १५० प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. खाडीपट्टा विभागाला वीजपुरवठा करणारी मुख्य वाहिनी पूर्वी समुद्रकिनाऱ्यालगतच्या शेतजमिनीवरून जात होती. ती रस्त्याच्या बाजूने नवीन खांब उभारून नेण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हरकतीमुळे थांबले होते. या बैठकीत दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधत रस्त्यावरील व गटारांतील अडथळा ठरणारे खांब हटवून रस्त्याच्या बाजूला योग्य ठिकाणी उभारून हे काम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
धोकादायक वीजखांब १० दिवसांत बदलणार; पथदीपांच्या वेळेत बदलाची मागणी
खाडीपट्ट्यातील पन्हाळजे, होडखाड (दत्तवाडी परिसर), सवणस, आमशेत, तांबे मोहल्ला या गावांमध्ये नादुरुस्त व धोकादायक स्थितीत असलेले वीजखांब तात्काळ बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढील १० दिवसांत या समस्यांचे निराकरण करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच तांबे मोहल्ला आणि इतर गावांतील नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर तातडीने दुरुस्त करण्यावर सहमती झाली. सध्या सायंकाळी ७ ते सकाळी ६ या वेळेत सुरू राहणारे पथदीप शाळकरी विद्यार्थी व कामावर जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ६:३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली, ज्याबाबत लेखी निवेदन देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या.

चिंचघर ते बहिरवली रस्त्याचे काम १६ नोव्हेंबरपासून सुरु होणार
बैठकीत सुसेरी ते पन्हाळजे आणि चिंचघर ते बहिरवली या मार्गांवरील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वप्नील पाटील यांनी स्पष्ट केले की, चिंचघर ते बहिरवली या सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे टेंडर पूर्ण झाले असून प्रत्यक्ष काम १६ नोव्हेंबरपासून वेगाने सुरू करण्यात येईल.













