अल निनोचा प्रभाव आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनात वाढ; पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य
रत्नागिरी : Ratnagiri Dams Water Storage Status संदर्भात अल निनोचा प्रभाव आणि वातावरणातील तीव्र बदलांमुळे यंदा राज्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाने ‘पिण्याच्या पाण्यालाच’ प्रथम प्राधान्य दिले आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण ७२ धरणांमध्ये सुमारे ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, गतवर्षीच्या तुलनेत यात ७ टक्क्यांची घट झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ६६ लहान धरणे, ३ मध्यम प्रकल्प आणि ३ कोल्हापूर टाईप धरणे आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या सर्व धरणांमधील पाणी सुरक्षित राखून ठेवण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यानुसार पाटबंधारे विभागाने नियोजन आखले आहे.
३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये सुमारे ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर यंदा तो ७५ टक्क्यांवर आला आहे. पाणीसाठा कमी असला तरी आगामी वर्षाचे नियोजन अत्यंत काटेकोर करण्यात आले आहे. धरणातील उपलब्ध एकूण पाणीसाठ्यातून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी लागणारे पाणी आणि त्यावरील १० टक्के अतिरिक्त साठा सुरक्षित म्हणून आरक्षित केला गेला आहे. पिण्याचे पाणी आरक्षित केल्यानंतरच उर्वरित साठा सिंचन किंवा इतर कामांसाठी वापरता येईल.

जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती (एका दृष्टिक्षेपात):
एकूण धरणे: ७२ धरणे (६६ लहान, ३ मध्यम आणि ३ के.टी. टाईप)
एकूण पाणीसाठा क्षमता: १२ टीएमसी
सध्याची पाणी टक्केवारी: ७५ टक्के (मागील वर्षी ८० टक्के होती)
आरक्षणाचा कालावधी: ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत
सुरक्षित साठा: गरजेपेक्षा १० टक्के जास्त अतिरिक्त साठा आरक्षित ठेवणार
उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनात वाढ; पाणी जपून वापरण्याचे आवाहन
यंदा सप्टेंबर महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. दरवर्षी ५ ते ११ टक्के इतके बाष्पीभवन होते; मात्र यंदा उन्हाळ्यातील वाढलेले दिवस पाहता हे प्रमाण १७ ते २० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जिल्ह्यात एकूण १२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा दावा पाटबंधारे विभागाने केला असला, तरी हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













