Ratnagiri: आजाराला कंटाळून ५४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; नाचणे परिसरातील घटना

Ratnagiri: आजाराला कंटाळून ५४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; नाचणे परिसरातील घटना

नाचणे येथील गणराज रेसिडन्सीमध्ये राहत्या घरी गळफास लावून संपवले जीवन; रत्नागिरी शहर पोलिसांत घटनेची नोंद

Ratnagiri Crime News: रत्नागिरी शहरातील नाचणे येथील विनम्रनगर परिसरातील गणराज रेसिडन्सीमध्ये एका ५४ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मणक्याच्या गंभीर आजारामुळे आलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. बाबासाहेब महादेव भागवत (वय ५४, रा. नाचणे विनम्रनगर, ता. जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राहत्या घरी घडली दुर्दैवी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत बाबासाहेब भागवत हे मागील काही काळापासून मणक्याच्या तीव्र आजाराने त्रस्त होते. या आजाराचा त्रास सहन होत नसल्यामुळे त्यांनी राहत्या घराच्या बेडरुममध्ये लाकडी स्टूल ठेवून, त्यावर चढून सिलींग फॅनला स्कार्फच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. फास घट्ट बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रत्नागिरी शहर पोलिसांत नोंद
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Shanti2