Ratnagiri Police Action: रत्नागिरीत अंमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा जोरदार प्रहार; वर्षभरात ९२ आरोपी जेरबंद, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Ratnagiri Police Action: रत्नागिरीत अंमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा जोरदार प्रहार; वर्षभरात ९२ आरोपी जेरबंद, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘एनकॉर्ड’ समितीच्या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनींची माहिती; एमआयडीसी आणि किनारपट्टीवर कठोर पाळत ठेवण्याचे निर्देश

Ratnagiri Police Action: जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेल्या धडक मोहिमेत तस्करांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS) तब्बल ६४ गुन्हे नोंदवून ९२ तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या धडक कारवायांमध्ये ब्राऊन हेरॉईन, हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी (Mephedrone) असा एकूण १४ लाख २८ हजार ६४ रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे, अशी महत्त्वाची माहिती अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली आहे.

जिल्हास्तरीय ‘एनकॉर्ड’ आढावा बैठक संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या’ (एनकॉर्ड) जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत अपर पोलीस अधीक्षक महामुनी बोलत होते. या उच्चस्तरीय बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे (Online) उपस्थित होते.

एमआयडीसी आणि सागरी किनारपट्टीवर विशेष पाहणीचे निर्देश
अंमली पदार्थांचे उच्चाटन हा केंद्र व राज्य शासनाचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचे स्पष्ट करत श्री. महामुनी यांनी यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले. एमआयडीसी परिसरातील संशयास्पद हालचालींवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि एमआयडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून बंद कारखाने व इतर आस्थापनांची कसून तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच, रत्नागिरीच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचा गैरवापर रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने अत्यंत दक्ष राहून जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटींची नियमित तपासणी करावी. विशेषतः, बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी व इतर परप्रांतीय कामगारांच्या पार्श्वभूमीची व कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करावी, असे स्पष्ट आदेश बैठकीत देण्यात आले.

Horizon techno.

ग्रामसभा आणि शाळांमधून प्रभावी जनजागृती
पोलीस दलातर्फे केवळ कायदेशीर कारवाईच नव्हे, तर ग्रामसभांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी आणि सायबर गुन्हेगारीविरोधात जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. शिक्षण विभागानेही यात मोलाची भूमिका बजावली असून, आता तरुणाईला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी ही लढाई स्वतःची मानून मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.