Tukaram Mundhe Action: कालबाह्य आणि भेसळयुक्त अन्नाविरुद्ध ‘एफडीए’ आक्रमक; ५ कोटींचा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा

Tukaram Mundhe Action: कालबाह्य आणि भेसळयुक्त अन्नाविरुद्ध 'एफडीए' आक्रमक; ५ कोटींचा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ८० परवाने रद्द, ३२ आरोपींवर गुन्हे दाखल

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त आणि कालबाह्य अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक मोहीम उघडली आहे। "सणासुदीच्या काळात भेसळयुक्त तेलावर आणि कालबाह्य अन्नावर आमची मोहीम सुरूच राहणार आहे," असा सडेतोड इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे Tukaram Mundhe Action यांनी दिला आहे। आतापर्यंत खाद्यतेलाच्या १,०८९ तपासण्या करण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर २८,७५३ क्विंटल माल जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली।

कालबाह्य अन्न पुन्हा साखळीत; विल्हेवाट लावल्याचा पुरावा देणे आता बंधनकारक

खराब आणि कालबाह्य झालेले अन्न नष्ट न करता विल्हेवाट प्रमाणपत्र दाखवून एजंटद्वारे पुन्हा विक्रीच्या साखळीत आणले जात असल्याचे, तसेच तारखांमध्ये फेरफार केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे। या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एफडीएने विशेष ‘कम्प्लायन्स ऑर्डर’ जारी केली आहे।

Infigo eyecare

"देशातील कोणत्याही राज्यात नसलेली ही ऐतिहासिक ऑर्डर असून, आता कालबाह्य झालेले अन्न पूर्णतः नष्ट केल्याचा ठोस पुरावा कंपन्यांना प्रशासनाला द्यावा लागेल," असे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले। कालबाह्य माल साठवण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांमार्फतच या अन्नाची विल्हेवाट लावावी लागणार आहे।

भिवंडी, वडपे येथे छापे; ५ कोटींचा माल जप्त

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत एफडीएने तब्बल ५ कोटी रुपयांचा बेकायदेशीर आणि कालबाह्य अन्नाचा साठा जप्त केला आहे। गेल्या १५ दिवसांत भिवंडी येथे ८० हजार रुपये आणि २६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर वडपे येथे दोन ठिकाणी कारवाई करून परवाने निलंबित करण्यात आले आहेत। या कारवाईदरम्यान १० मोठ्या प्रकरणांनंतर थेट मालकांची नावे समाविष्ट करून २ गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले असून, यामध्ये एकूण ३२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।

"अन्न व्यावसायिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून कालबाह्य अन्नाची एकही पिशवी बाजारात येणार नाही, याची दक्षता कंपनी लहान असो वा मोठी सर्वांनीच घेतली पाहिजे," असे सांगत तुकाराम मुंढे यांनी हे काम सातत्याने सुरूच राहील असे स्पष्ट केले।