डॉग स्कॉडसह बॉम्ब शोधक पथकाकडून कोपऱ्यान् कोपऱ्याची कसून तपासणी सुरू; मॉक ड्रिल की घातपाताचा कट? अद्याप स्पष्टता नाही, नागरिकांना शांततेचे आवाहन
रत्नागिरी :
रत्नागिरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा मेल पोलिसांच्या निदर्शनास येताच रत्नागिरी शहर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण यंत्रणेसह न्यायालयाच्या दिशेने धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तात्काळ न्यायालयाची मुख्य इमारत आणि संपूर्ण परिसर पूर्णपणे रिकामा (खाली) केला असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांची माहिती :
या गंभीर घटनेबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी प्राथमिक माहिती दिली आहे. न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याची माहिती समजताच पोलीस प्रशासनाने तत्काळ पावले उचलत घटनास्थळ गाठले. सुरक्षेचा उपाय म्हणून न्यायालयातील सर्व न्यायाधीश, कर्मचारी, वकील आणि पक्षकारांना सुरक्षितरीत्या इमारतीबाहेर काढण्यात आले.

डॉग स्कॉड दाखल; कोपऱ्यान् कोपऱ्याची कसून तपासणी :
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ श्वान पथक (डॉग स्कॉड) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून जिल्हा न्यायालयाची मुख्य इमारत, आवारातील वाहने आणि संपूर्ण परिसराचा कोपऱ्यान् कोपरा पिंजून काढला जात आहे. न्यायालय परिसराच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक नाकाबंदी करण्यात आली असून, प्रवेश पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.
मॉक ड्रिल की घातपाताची धमकी? गूढ कायम :
पोलिसांकडून सुरू असलेले हे अत्यंत तातडीचे आणि मोठे सर्च ऑपरेशन नेमके सुरक्षा यंत्रणेचे ‘मॉक ड्रिल’ (सराव) आहे, की खरोखरच घातपाताचा कट रचणारा असा धमकीचा ई-मेल आला आहे, याबाबत अद्याप पोलीस प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतरच यामागचे सत्य समोर येणार आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये; पोलिसांचे आवाहन :
न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा ताफा, सायरन वाजवत आलेल्या गाड्या आणि डॉग स्कॉडमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे शांततेचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.













