मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फुटणार; विक्रेत्यांसाठी शहरात १२ जागा निश्चित
रत्नागिरी:
रत्नागिरी शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामआळी आणि मारुतीआळी परिसरातील रस्ते फेरीवाले आणि पथविक्रेत्यांमुळे तुंबून राहण्याच्या समस्येवर अखेर रत्नागिरी नगरपरिषदेने कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. या गर्दीच्या ठिकाणी विक्रेत्यांना बसण्यास नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी ठाम नकार दिला असून सर्व पथविक्रेत्यांना नगरपरिषदेने निश्चित केलेल्या अधिकृत हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय स्थलांतरित करणे भाग पाडले आहे. या निर्णयानुसार विक्रेत्यांना ‘शनिवार आठवडाबाजार’ या ठिकाणी आखून दिलेल्या जागेत व्यवसाय सुरू करावा लागला आहे.
Ratnagiri Hawkers Zone Shift : रामआळी, मारुतीआळीतील अरुंद रस्त्यांना मोकळा श्वास
रामआळी आणि मारुतीआळी येथील रस्ते अत्यंत अरुंद आहेत. सण-उत्सवांच्या काळात रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असे, तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचीही मोठी अडचण होत होती. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत फेरीवाले आणि पथविक्रेत्यांसाठी शहरात एकूण १२ जागा (हॉकर्स झोन) निश्चित करण्यात आल्याचे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी स्पष्ट केले.

या नियोजनामुळे सोमवारी सकाळीच नगरपरिषदेच्या मालमत्ता विभागाचे अधिकारी विजय कदम, आनंद थोरात आणि जितेश पोवार यांनी घटनास्थळी पोहोचून मारुतीआळी व रामआळीतील विक्रेत्यांना आठवडाबाजारातील निश्चित जागी जाण्याच्या सूचना दिल्या. दुकानदारांनी दिवाळी सणाचा विचार करून जुन्याच जागी बसू देण्याची विनंती नगराध्यक्षांकडे केली, परंतु नगराध्यक्षांनी ती फेटाळून लावत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले.
शहरातील विविध परिसरांसाठी निश्चित करण्यात आलेले हॉकर्स झोन
नगरपरिषदेच्या नवीन हॉकर्स झोन यादीनुसार शहरभरातील विक्रेत्यांसाठी खालीलप्रमाणे जागा निश्चित करण्यात आल्या आहेत:
साळवी स्टॉप ते शिवाजीनगर परिसर: या भागातील फेरीवाल्यांसाठी साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळील जागा राखीव.
मारुती मंदिर परिसर: छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या पूर्वेकडील बाजू विक्रेत्यांसाठी निश्चित.
इतर प्रमुख ठिकाणे: स्वर्गीय प्रमोद महाजन मैदानाच्या बाजूची जागा, खादी ग्रामोद्योग शेजारील परिसर आणि पोस्ट ऑफिस जवळील गाडीतळाची संपूर्ण जागा.
धनजीनाका व मासळी मार्केट: या भागातील विक्रेत्यांना नगरपरिषद शाळा क्रमांक १४ चे मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर: रुग्णालयाकडून निवखोलकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रुग्णालयाच्या बाहेरील सर्व स्टॉलधारकांसाठी स्वतंत्र जागा आखण्यात आली आहे.













