मांडवी ते मिरकरवाडा मार्गावरील पेठकिल्ला परिसरातील कारवाई; शहर पोलिसांची धडक मोहीम
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील मांडवी ते मिरकरवाडा जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पेठकिल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विवेक शांताराम कळंबटे (वय ३८, रा. पेठकिल्ला कुरणवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुप पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री संशयित विवेक कळंबटे हा मांडवी ते मिरकरवाडा जाणारे रस्तालगत असलेल्या पेठकिल्ला भागात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार कायदेशीर कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या समाजकंटकांवर शहर पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.














