हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि शिवछत्रपती परिवाराचा पुढाकार; गंगामाईच्या कृपेने राजापुरात पावसाचे आगमन
राजापूर :
निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणून ख्याती असलेल्या राजापूर शहरानजीकच्या उन्हाळे येथील ऐतिहासिक ‘गंगातिर्थ’ परिसरात नुकतीच एक मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. संस्थान श्री गंगामाई देवस्थान, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान (राजापूर) आणि राजा शिवछत्रपती परिवार (रत्नागिरी) यांच्या संयुक्त सहभागातून पार पडलेल्या या मोहिमेमुळे गंगातिर्थ परिसराचे संपूर्ण रूपडे पालटून गेले आहे. बाराव्या शतकातील शिलाहर राजांच्या काळापासून आणि शिवकालीन इतिहासाशी नाळ जोडलेल्या या पवित्र स्थळाच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मोहिमेची सुरुवात अत्यंत धार्मिक वातावरणात झाली. यावेळी गंगा देवस्थानाचे अध्यक्ष तथा गंगापुत्र श्रीकांत घुगरे यांनी उन्हाळे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी व गंगामाईचे विधिवत पूजन केले. तसेच परिसरातील श्रीदेव रामेश्वर, श्री दत्तप्रभु, स्थानदेवता आणि क्षेत्रपाल देवता यांना श्रीफळ वाढवून प्रार्थना करण्यात आली. या पूजनात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर आणि राजा शिवछत्रपती परिवार रत्नागिरी विभाग प्रमुख दिनेश कुरटे यांनीही सहभाग घेतला. यानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे शिववंदना सादर करत प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्र म्हटला. छत्रपती शिवरायांच्या जयजयकारात या स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष श्रीगणेशा करण्यात आला.
स्वच्छतेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. प्रत्येकी दहा जणांचे पाच गट तयार करून संपूर्ण गंगाक्षेत्राची आणि सर्व कुंडांची कसून स्वच्छता करण्यात आली. "हर हर महादेव" आणि "गंगामाईचा उदो उदो" अशा जयघोषाने आणि उत्साही वातावरणात सर्व शिलेदार या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेच्या नियोजनाची जबाबदारी मंदार बावधनकर आणि अलंकार मयेकर यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडली. मोहिमेदरम्यान चहा-बिस्कीट, नाश्ता व सुक्या खाऊची व्यवस्था परिसरातील अनेक शिवप्रेमींच्या मदतीने करण्यात आली, तर दुपारच्या महाप्रसादाची जबाबदारी गंगा संस्थानाच्या वतीने पार पाडण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राजापूरसह महाराष्ट्र आणि देशातील दुष्काळ दूर होऊ दे, असे कळकळीचे गाऱ्हाणे गंगामाईला घालण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रार्थनेनंतर जणू गंगामाई हाकेला धावली आणि त्याच रात्री राजापुरात पावसाचे जोरदार आगमन होऊन एकच सुखद गारवा निर्माण झाला. दिवसभरात राजापूरमधील अनेक मान्यवरांनी घटनास्थळाला भेट देऊन छत्रपती शिवरायांना आदर्श मानून देव, देश आणि धर्मासाठी झटणाऱ्या लहान-थोर, महिला व पुरुष शिलेदारांच्या कार्याची प्रशंसा केली.
बारव्या शतकात शिलाहर राजांच्या काळात आणि शिवकाळात छत्रपती शिवरायांच्या राजाश्रयानंतर, आज अनेक शतके लोटली तरी हे गंगा संस्थान सध्या जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. देवस्थान समितीशी चर्चा केल्यानंतर, सध्या या ठिकाणी जीर्णोद्धाराचा सविस्तर प्रस्ताव व आराखडा तयार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती गंगा संस्थानाच्या वतीने देण्यात आली. या ऐतिहासिक आणि पवित्र कामात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानने सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
या स्वच्छता मोहिमेत राजापूरमधून गंगापुत्र राहुल काळे, रोहित घुगरे, केदार साने, महेश सप्रे, विवेक गुरव, मोहन घुमे, प्रसन्न देवस्थळी, निकेश पांचाळ, निखिल चव्हाण, अभिजित नार्वेकर, वैभव तोरस्कर, विनोद पवार, श्रीमती प्रणोती भोसले, सुभाष नवाळे, माधवी हर्डीकर, संदेश टिळेकर, रघुवीर बापट, जायदे गुरुजी, विजय हिवाळकर, पवी बोटले यांच्यासह राजा शिवछत्रपती परिवारातर्फे रत्नागिरी, चिपळूण, मुंबई, गावखडी, रनपार, कशेळी आणि आडीवरे यांसारख्या विविध ठिकाणांहून आलेल्या एकूण सुमारे ७० शिलेदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र, या राष्ट्रीय आणि सामाजिक उपक्रमात राजापूरमधील स्थानिक नागरिकांचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याबद्दल उपस्थितांनी खंत व चिंता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांमध्ये परस्पर संवाद साधत शिवकार्याची माहिती देण्यात आली. तसेच या मोहिमेला सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. शेवटी गंगामाई देवस्थानाला वंदन करून व छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत शिलेदारांनी एकमेкаंचा निरोप घेतला आणि लवकरच पुढील मोहिमेत भेटू असा संकल्प करत या प्रेरणादायी स्वच्छता मोहिमेची सांगता झाली.













