Lanja Crime News: वेरळ येथे शिक्षकाला मारहाण; मद्यधुंद व्यक्तीला लांजा पोलिसांकडून अटक

Lanja Crime News: वेरळ येथे शिक्षकाला मारहाण; मद्यधुंद व्यक्तीला लांजा पोलिसांकडून अटक

मद्यधुंद अवस्थेत शाळेत येऊन शिक्षकावर हल्ला

लांजा :
लांजा तालुक्यातील वेरळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत घडलेल्या एका गंभीर प्रकारात, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एकाने शाळेतील शिक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी लांजा पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मध्यरात्री त्याला अटक केली आहे. कुणाल कुर्णेकर (वय ३८, रा. वेरळ गायदडीवाडी, ता. लांजा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लांजा येथील धावणेवाडी येथे राहणारे शिक्षक नंदकुमार बळीराम भागवत (वय ५३) हे मंगळवारी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास वेरळ जि. प. मराठी शाळेत कार्यालयीन रजिस्टर भरण्याचे काम करत होते. याच दरम्यान, कुणाल कुर्णेकर हा मद्यधुंद अवस्थेत शाळेत आला आणि त्याने थेट शिक्षक भागवत यांच्या अंगावर धाव घेत त्यांचा कॉलर पकडून धक्काबुक्की केली.

या धक्काबुक्की आणि मारहाणीनंतर शिक्षक नंदकुमार भागवत यांनी तात्काळ लांजा पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल देत गुन्हा नोंदवला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलिसांनी कारवाई करत मध्यरात्री सव्वाबारा वाजता संशयित कुणाल कुर्णेकर याला बेड्या ठोकल्या. शासकीय कर्तव्य बजावत असताना शिक्षकावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विलास जाधव करत आहेत.

Radhakrushna patapedhi