Lanja News: निवसर येथे आंबा-काजू बागेत रानगव्याचा संशयास्पद मृत्यू

Lanja News: निवसर येथे आंबा-काजू बागेत रानगव्याचा संशयास्पद मृत्यू

वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी आणि शवविच्छेदन पूर्ण; मृत्यूचे कारण अस्पष्ट

लांजा :
लांजा तालुक्यातील निवसर शिवार भाटले येथील आंबा-काजूच्या बागेमध्ये एका पूर्ण वाढ झालेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या रानगव्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वनविभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवसर शिवार भाटले येथील स्थानिक शेतकरी भरत रामचंद्र झाडवे यांच्या मालकीच्या आंबा-काजू बागेमध्ये हा मृत रानगवा आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील दत्ताराम शांताराम मेस्त्री यांनी तातडीने दूरध्वनीद्वारे लांजाचे वनपाल धुळू कोळेकर यांना घटनेबाबत अवगत केले. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने विलंब न लावता घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक पाहणीनुसार मृत रानगवा अंदाजे १० ते १२ वर्षे वयाचा असल्याचे निदर्शनास आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनुसे यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यामार्फत मृत रानगव्याचे घटनास्थळीच रीतसर शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले. या संपूर्ण कारवाई दरम्यान विवेक कांबळे, सागर तारी, शरद शिंदे, प्रशांत शिंदे, पोलीस पाटील दत्ताराम मेस्त्री यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Arihant 3

या शोध व पंचनामा कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी (रत्नागिरी) विक्रम गुरव, परिमंडळ वन अधिकारी धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे व श्रावणी पवार तसेच लांजा जलद बचाव पथकाचे सदस्य अमित लांजेकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. ही सर्व कारवाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, रानगव्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा उलगडा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा विस्तृत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.