Guhagar Cyber Crime Fraud: सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची १५ लाखांची फसवणूक

Guhagar Cyber Crime Fraud: सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची १५ लाखांची फसवणूक

गुहागरमधील ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी; बनावट बँक खात्याचा बोगस धसका दाखवून लुटले १५ लाख रुपये

Guhagar Cyber Crime Fraud बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून गुंतवणुकीच्या आमिषाने गुहागर तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी (ता. ७) नोव्हेंबर रोजी गुहागर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संदीप दिवाण असे या प्रकरणातील संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सहदेव गडदे (वय ६८, व्यवसाय निवृत्त, सध्या रा. मुलुंड पूर्व, मुंबई; मूळ रा. कीर्तनवाडी, गुहागर, जि. रत्नागिरी) हे गणपती उत्सवानिमित्त गुहागर येथे आले होते. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संशयिताने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सॲप कॉल करून आपण बंगळूर येथील सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. संशयिताने तक्रारदारांच्या नावाने कॅनरा बँकेच्या मुलुंड येथील शाखेत खाते उघडण्यात आल्याची बतावणी केली. या खात्यातून तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगून, त्यापैकी दहा टक्के म्हणजेच ३० लाख रुपये सदाकत खान याना दिल्याचेही त्याने भासवले. तक्रारदारांच्या खात्यात केवळ २० हजार रुपये असल्याचे सांगितल्यानंतर संशयिताने कॉल कट केला.

त्यानंतर संशयिताने तक्रारदारांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल असल्याची प्रत पाठवली, मात्र ती मिळणार नाही असे सांगून संदेश डिलीट केला. तसेच तपासासाठी ठरावीक रक्कम खात्यावर जमा करावी लागेल, अन्यथा अटक केली जाईल, अशी गंभीर धमकी दिली.

Arihant 4

Guhagar Cyber Crime Fraud: धनादेशाद्वारे उकळली १५ लाखांची रक्कम
१ ऑक्टोबरला संशयिताने पुन्हा व्हॉट्सॲप कॉल करून तपासासाठी २५ लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबार वाजण्याच्या सुमारास संशयित संदीप दिवाण याने तक्रारदारांकडून बँक खात्याचा क्रमांक घेतला आणि त्यांच्या एसबीआय (SBI) बँकेच्या चेकबुकवर १५ लाख रुपयांचा धनादेश भरून तो मुलुंड पूर्व येथील एसबीआय शाखेत जमा करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी विश्वासात येऊन धनादेश बँकेत जमा केला. मात्र, आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.

गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी विजय गडदे यांनी गुहागर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित अद्याप अटकेत नसून, पोलिस या संपूर्ण रॅकेटचा कसून तपास करत आहेत.